वसंत व्याख्यानमालेतलं माझं हे दुसरं व्याख्यान आहे. मला का व्याख्यानाला बोलवतात मला आजपर्यंत कळलेलं नाही, व्याख्यान देणं हे विचारवंतांचं काम असतं. ती माणसं येऊन ते देत असतात, असं राज ठाकरे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत ‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान दिलं आणि त्यांचे विचार मांडले.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, माझी काही महत्त्वाची किंवा मोजकी भाषणं आहेत. शिवतीर्थावरचं असेल, एस.पी. महाविद्यालयातलं असेल हे तुम्ही माझ्या घरातल्यांना विचारु शकता, माझ्या हातापायांना घाम फुटलेला असतो. अनेकजण म्हणतील की काहीतरी बोलता, पण मी हे खरं सांगतो. मी अनेकदा अशा भाषणांच्या दिवशी मी कुणाशी बोलतही नाही. का? तर मी भाषण करणारा माणूस आहे. व्याख्यानात एका विषयावर संबंधित तुम्हाला बोलायचं असतं. व्याख्यान ही गोष्ट लिहून काढली तर त्याला निबंध म्हणता येईल. आज मला दिलेला जो विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राची आठवण
पुढे आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंशी बोलत होतो. शिवछत्रपतींच्या इतिहासातून बाबासाहेबांनी काय सांगितलं? तर त्यातून आपण बोध काय घेतो हे महत्त्वाचं आहे. त्यावर मला त्यांनी अप्रतिम गोष्ट सांगितली, ते म्हणाले होते शिवछत्रपती आजच्या काळात तुम्ही कसं जगावं हे त्या काळात सांगत होते. आज आपण ज्या काळात जगतो आहोत, त्या काळात कसं जगलं पाहिजे ते शिवछत्रपतींचा इतिहास वाचला तर कळतं. आपण काय वाचतो? आग्र्याहून सुटका वाचतो, अफझल खानाचा वध वाचतो, शाईस्ते खानाची बोटं छाटली ते वाचतो, सिद्दी जौहारचा वेढा तोडून महाराज कसे आले ते बघतो. पण ५० वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपल्याला काय शिकवलं? महाराष्ट्राने कसं राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. अशाच अनेक गोष्टींची परंपरा ही फक्त महाराष्ट्राला लाभली आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या सगळ्या प्रदेशांची राज्यं झाली. पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्यात तुम्हाला अद्भूत पराक्रम गाजवलेली माणसं मिळतील. भारताच्या इतर राज्यांमध्ये अशी माणसं सापडणार नाहीत.
रविंद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कवितेचा भावार्थ जेव्हा राज ठाकरे वाचतात
महाराष्ट्राची ओळख काय आहे? तर एक गोष्ट वाचून दाखवतो. हा मराठीतला भावार्थ आहे. १९०४ मध्ये रविंद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेली कविता आहे. शिवछत्रपतींचा आदर्श, त्यांच्याविषयीचं प्रेम, हेवा कुठपर्यंत पसरला होता हे बघा. सगळ्यांना शिवछत्रपती कळले होते, महाराष्ट्राला कळले नाहीत. टागोरांच्या कवितेचा भावार्थ काय आहे बघा, हे शिवाजी महाराज आज आम्ही तुम्हाला इतिहासातील राजा म्हणून आठवत नाही तर एका जागृत शक्तीप्रमाणे पुन्हा आमंत्रित करतो. तुम्ही तलवारीने जिंकलेली भूमी नाही तर आत्मसन्मान जागवलेला जनसमुदाय हीच खरी तुमची परंपरा. तुम्ही लोकांना फक्त राज्य दिलं नाहीत, तर स्वराज्य दिलंत. भीतीच्या सावलीतून बाहेर पडून उभं राहणं काय असतं हे शिकवलंत. आजही आम्ही तसेच गुलाम आहोत, भीतीचे, आळसाचे आणि परावलंबित्वाचे. तुम्ही शत्रुंशी लढता, आम्हाला स्वतःशी लढायला शिकायचं आहे. हे शिवाजी तुमचा उत्सव फक्त ढोल ताशांमध्ये नको, तो विचारांमध्ये, कृतीत, स्वभावात दिसायला हवा. तुमचं नाव घेणं सोपं आहे पण तुमच्यासारखं जगणं कठीण आहे. तुम्ही साधेपणात महानता दाखवलीत तर धर्मात सहिष्णुता सत्तेत संयम. आज आम्ही सत्तेला स्वार्थ समजतो आणि धर्माला भेदभाव आणि राष्ट्राला घोषणा. शिवाजी महाराज तुमचा उत्सव तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक माणूस स्वतःच्या मनातलं राज्य जिंकेल. उठा, जागे व्हा, तुमची तलवार आता लोखंडाची नाही तर विचारांची असावी. तुमचा किल्ला आता डोंगरांमध्ये नाही तर लोकांच्या विचारांमधे असावा. हे शिवाजी आम्हाला पुन्हा शिकवा स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नाही तर जबाबदारी आहे. रविंद्रनाथ टागोरांनी हे १९०४ मध्ये लिहून ठेवलं आहे. जे आम्हाला अजूनही समजत नाही. महाराष्ट्राची संत परंपरा अशी परंपरा तुम्हाला कुठेही सापडणार नाही. संतांनी आपल्या या भागाची ज्याला आपण राज्य म्हणतो त्याची वैचारिक मशागत केली. जातीपातीपासून सगळ्यांना दूर लोटलं, भेदभाव काढून टाकले.
स्वच्छ भारत योजनेचे खरे सिंबॉल गाडगेबाबा हवे होते-राज ठाकरे
स्वच्छ भारत योजनेचा खरा सिंबॉल हे आमचे गाडगेबाबा हवे होते. कधीतरी आपल्या पुस्तकांमध्ये डोकवा. संतांनी आपल्याला काय दिलं आहे तु्म्हाला समजेल. बाहेरच्या राज्यांमधले लोंढे महाराष्ट्रात येतात कारण जे वातावरण इथे आहे ते भारतातल्या कुठल्याही इतर राज्यांमध्ये नाही. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी मुली, महिला कुठल्याही वेळी बसने फिरत असतात. महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांची छेड काढणार नाही किंवा त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. अनेक महिला, मुली, अनेक मुलं त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रात येतात. दिल्लीच्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही असं मुली सांगतात. संध्याकाळी ७ नंतर दिल्लीत फिरायला भीती वाटते ही मुली सांगतात. देशाच्या राजधानीत महिला असुरक्षित असतील तर काय म्हणणार? आज हरभजन सिंगपासून सगळे लोक मुंबईत येऊन स्थायिक झाले, अनेक लोक पुण्यात स्थायिक झाले. का? कारण इथल्या इतकं सुरक्षित वातावरण कुठे नाही. आपल्याकडे हा मोकळेपणा आला कारण तो महाराष्ट्राचा स्थायीभाव आहे.
आपल्या संतांनी आपला महाराष्ट्र घडवला
संतांनी जो महाराष्ट्र घडवला त्यातून आपण हे सगळं पाहतो आहोत. मोगलांनी आक्रमण केलं, यांनी केलं, त्यांनी केलं. या सगळ्यामध्ये बंडखोरीचा विचार एका स्त्रीच्या मनात आला. माझ्या भूमीवरचं माझं राज्य यातून शब्द आला स्वराज्य. हा विचार एका बंडखोर मुलीमध्ये आला, जिने आपल्या वडिलांना हे सांगायचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या नवऱ्यालाही सांगितलं, त्यांनी तो प्रयत्न केलाही. त्या आमच्या जिजाऊसाहेब. शहाजीराजेंनी बंड केलं, फसलं. मग ती संपूर्ण गोष्ट त्यांनी आपल्या मुलाकडून करुन घेतली. विचार करा, शिवछत्रपती म्हणतो, पण त्यावेळी जो संपूर्ण पगडा होता तो मोगली होता, भाषेवर फारसी पगडा होता. आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं मराठी शब्दकोश काढा आणि तो पगडा काढा, संस्कृत ही महाराजांची आवडती भाषा होती. मराठी शब्दकोश निर्माण करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. आपण फक्त शिवाजी महाराज की जय घोषणा देणार, आपण भाषा कशी बोलतो? काय बोलतो याकडे आपलं लक्ष आहे का? महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी यांना पुतळ्यांना हार घालून आपण ते साजरं करतो, त्यांचा विचार लक्षात घेत नाही त्यामुळे महाराष्ट्राची ही अवस्था आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
