Vijay Wadettiwar On BJP : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झालेली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपद, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची मदत यासह राज्यातील विविध महत्वाच्या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. या सर्व घडामोडींबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी खोचकपणे भाष्य करत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने भाजपाकडून काय शिकलं पाहिजे? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. यावर वडेट्टीवार यांनी चार मुद्दे सांगितले आहेत. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या माझा व्हिजनमध्ये बोलत होते.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

भाजपाकडून काँग्रेस आणि महाविकास आघाडीने काय शिकलं पाहिजे? यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही त्यांच्याकडून दोनच गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्या म्हणजे आम्ही आमच्या भाषणाचे मुद्दे बदलले पाहिजेत. हिंदू-मुस्लिम करत राहिलं पाहिजे. आम्ही भारत-पाकिस्तान करत राहिलं पाहिजे. तसेच आणखी एक मुद्दा की आम्ही मशिद-मंदिराबाबत आमचं भाषण सुरू असलं पाहिजे, पण ते मंदिराच्या बाजूने. तरच आम्हाला यातून पुढे जाण्यासाठी स्कोप आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

‘जेलमध्ये जाईन, पण भाजपात नाही’

“मी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आता सांगतो काय करतील? वर्षभर जेलमध्ये ठेवतील. कुठले तरी आरोप होतील. आता सर्वजनिक जीवनात आणि राजकारणात आरोप होत असतात. त्यामुळे आपण जेलमध्ये जाऊ, तशी तयारी देखील आहे. पण माझं नाव पुन्हा पक्ष बदलण्याच्या यादीत येऊ नये असं माझं मत आहे. जेलमध्ये जाईन, वर्षभर जेलमध्ये राहील पण भाजपात जाणार नाही. आम्हाला विरोधात तर लढू तर द्या, सर्वज भाजपात गेल्यानंतर लढणार कोण?”, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.