Sukhbir Singh Badal Attacked: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल या राजकीय पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारामध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. निहंग शीख असलेल्या ६२ वर्षीय जसपाल सिंग यांनी आपल्या जवळील कृपाणने (तलवार) सुखबीर सिंग बादल यांच्यावर अचानक हल्ला केला. ज्यात बादल यांच्या हाताला आणि खांद्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर त्यांना नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान हल्लेखोर जसपाल सिंग यांना अटक करण्यात आली असून ते मूळचे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, जसपाल सिंग पुण्यातील असून येथील न्यायालयात त्यांनी काही काळ वकिली केली आहे. दोन वर्षांपासून नांदेडजवळील मुगत येथील माता साहिब देवन जी गुरुद्वाराशी ते संबंधित आहेत.

आज सकाळी सुखबीर सिंग बादल हे नांदेडमधील तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह आले होते. सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर गुरुद्वारात त्यांचा सत्कार झाल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता ते गुरुद्वारातून बाहेर येत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली.

जसपाल सिंग हे सुखबीर सिंग बादल यांच्या जवळ गेले आणि त्यांनी कृपाणने त्यांच्यावर हल्ला केला. बादल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत मारेकरी जसपाल सिंग यांच्यावर ताबा मिळवला. यात महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी संतोष केंद्रे जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

आरोपीने काय म्हटले?

पोलिसांनी हल्लेखोर जसपास सिंगला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली. ‘मला वाटले म्हणून मी त्यांच्यावर हल्ला केला’, अशी एकच प्रतिक्रिया हल्लेखोर जसपाल सिंग यांनी दिली असल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे. मात्र पोलिसांना हल्लेखोराचे विधान मोघम वाटत असून तो खरे कारण सांगत नसल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीस खऱ्या कारणाचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी बादल यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नांदेड पोलिसांना त्यांनी या घटनेमागील उद्देशाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षांत दुसऱ्यांदा गुरुद्वारामध्ये हल्ला

सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुद्वारातच जीवघेणा हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा ठोठावल्यानंतर ते सुवर्ण मंदिरात सेवा प्रदान करत होते. यावेळी नरैन सिंग चौरा या माजी अतिरेक्याने त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे चौरा याचा नेम चुकला आणि सुखबीर सिंग बादल या हल्ल्यातून बचावले होते.