When Raj Thackeray Praised Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला गेले होते. विमान बारामतीत लँड होण्यापूर्वीच अपघात झाला आणि त्या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचं निधन झालं. अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते अजित पवारांना श्रद्धांजली वाहत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकदा अजित पवारांचं कौतुक केलं होतं. त्यांचा व्हिडीओ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

​राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत अजित पवार यांचे भरभरून कौतुक केले होते, तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील, पण या माणसाला जातीच्या राजकारणाने कधीही शिवले नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

“१९९९ साली जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, आज राष्ट्रवादीचे लोक अजित दादांबरोबर आहेत. माझे अजित पवारांबरोबर अनेक मतभेद असतील, पण एक गोष्ट निश्चित सांगतो अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. मी आजपर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहत आलो आहे. एका गोष्टीत शरद पवारांबरोबर राहूनही अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं मला आठवत नाही,” असं एका जाहीर सभेत राज ठाकरे अजित पवारांबद्दल म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ-

आज अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज ठाकरेंचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. मनसे कार्यकर्तेही राज ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक केल्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

दरम्यान, अजित पवारांचे निधन झाल्यानंतर युगेंद्र पवार व रोहित पवार रुग्णालयात पोहोचले आहेत. त्याचबरोबर कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात रुग्णाबाहेर आक्रोश करत आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, अजित पवारांचे काका शरद पवार, बहीण सुप्रिया सुळे हे सर्वजण दिल्लीत होते. अजित पवारांच्या अपघाताबद्दल कळताच ते सर्वजण दिल्लीहून बारामतीसाठी रवाना झाले आहेत.