MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या पुण्यात सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार करत आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार या आंदोलनात येणार का? याबाबत आता रोहित पवार यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी झालेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
रोहित पवार नेमकं आंदोलनाबाबत काय म्हणाले?
कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी एक प्रस्ताव राज्यपालांना पाठवण्यात आला होता. तसा प्रस्ताव राज्य सरकारने विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पाठवला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत आहात का? हे विचारलं असता रोहित पवार म्हणाले, जात-पात किंवा धर्म यांचं राजकारण करण्यापेक्षा विद्यार्थी अडचणीत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसलो आहोत. शेतकऱ्यांसाठी, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही उभे आहोत. जर याला सत्ताधारी राजकारण म्हणत असतील तर तुमच्या जात-पात आणि धर्माच्या राजकारणापेक्षा सामान्य लोकांसाठीचं हे राजकारण चांगलं असं रोहित पवार यांनी लोकसत्ता डॉट कॉमला सांगितलं आहे.
शरद पवार आंदोलनात कधी जाणार?
पुढील दोन दिवसांत राहुल गांधी आंदोलनाला भेट देणार आहेत. शरद पवार यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही या आंदोलनात लगेच येऊ नका. सरकारला योग्य वेळी जेव्हा झटका द्यायचा असेल त्यावेळी आम्ही शरद पवार यांना इथे बोलवून घेऊ. महाराष्ट्रात आंदोलनं होत आहेत त्याबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, संविधान आणि लोकशाहीला धरून राजकारण केलं जात नाही तेव्हा ही परिस्थिती येते. अहंकार जेव्हा राज्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतो तेव्हा सामान्य लोकांशी नाळ तुटते, त्यानंतर अशी स्थिती येते. आंदोलन आणि सत्याग्रह करण्याशिवाय मार्ग उरत नाही. या ठिकाणी २५ लाख विद्यार्थी आहेत त्यांना हे वाटतं आहे की आयोगात जो भ्रष्टाचार आहे तो दूर झाला पाहिजे आणि पारदर्शकता आली पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अध्यक्षांच्या राजीनाम्याची आमची प्रमुख मागणी आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
आज अजित पवार असते तर…
आज अजित पवार जर असते तर कशी स्थिती असती? हे विचारलं असता रोहित पवार म्हणाले, अजितदादा आज असते तर ते सत्ताधारी असतानाही या आंदोलनात आले असते आणि विद्यार्थ्यांशी बोलून त्यांची अडचण सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता. मात्र आज जे सत्तेत आहेत त्यांना अशी काही आवश्यकता वाटत नाही हे दुर्दैवी आहे. अजितदादा नसल्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
