दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्तरावरची AI परिषद सुरु झाली आहे. जगभरातले अनेक दिग्गज दिल्लीत येणार आहेत. ही चौथी AI परिषद आहे. याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या विशेष कार्यक्रमात विश्लेषण केलं आहे.
काय म्हटलं आहे गिरीश कुबेर यांनी ?
AI वगैरे जाऊदेत पण मुलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये कुठे आहोत आणि AI मध्ये आपण कुठे आहोत हे पाहणं आवश्यक असतं. अशा जेव्हा लाटा येतात तेव्हा शांतपणे उभं राहून मागे वळून पाहणं आवश्यक असतं. १९९६-९७ मध्ये डॉट कॉम बुम आलं होतं. इंटरनेटचा जन्म झाला होता आणि जग कसं बदलणार वगैरे वल्गना सुरु झाल्या होत्या. त्याही वेळेला आवाक्याच्या पलिकडच्या गोष्टी बोलल्या गेल्या. जग किती बदललं हे आपण पाहिलं आहे. त्यावेळी भारताची तंत्रज्ञानाची बस चुकली, जे करायचं ते आपण करु शकलो नाही वगैरे चर्चा झाल्या. या पार्श्वभूमीवर AI बस आपण पकडणार. पुढचं तंत्रज्ञान भारतातून विकसित वगैरे होईल. कदाचित होईलही, सदिच्छेला प्रयत्नांची जोड आवश्यक असते. आत्ता तरी तशी परिस्थिती नाही. AI ची ५० मॉडेल्स अमेरिकेने विकसित केली आहेत असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
यानंतर गिरीश कुबेर म्हणाले, भारतात आयटी क्षेत्रातल्या भव्य कंपन्या आहेत त्यांचा बाजार उठतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. कारण मागच्या आठवड्यात अमेरिकेने आणलेलं एक अॅप. या सगळ्यासाठी जे कोडिंग करावं लागतं, संगणकीय समीकरणं जुळवावी लागतात, या सगळ्याला AI मुळे फाटा मिळू शकेल. काय हवं आहे ते सांगायचं, आत्ता जसं चॅटजीपीटी किंवा जेमिनीला जे आपण सांगतो त्याच्या ५० टक्के पुढचा टप्पा आंथ्रोपिकने विकसित केला आहे. तुम्ही इच्छा व्यक्त कराल तर तो तुम्हाला अॅपच तयार करुन देईल. म्हणजेच संगणक अभियंते नाकाम आणि निरुपयोगी ठरतील. आत्तापर्यंत असं म्हटलं जातं होतं AI माणूस विकसित करत होता. आता टप्पा असा आला आहे की AI च पुढचं AI विकसित करणार आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा येऊन पोहचला आहे. अमेरिका प्रचंड पुढे आहे, चीनचे १५ असे स्वतःचे एआय आहेत. युरोपिय खंडातून तीन प्रारुपं समोर आली आहेत. त्यांचा वापर सुरु झाला आहे. त्या तुलनेत आपण फार कुठेही नाही आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. आधीच्या सरकारांना काही माहीत नव्हतं असं म्हणायची पद्धत आहे पण या सरकारलाही उशिराच जाग आली. चीनची प्रारुपं आल्यानंतर हे कळलं की भारतालाही AI विकसित करावं लागेल.

