देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात निर्माण झालेला वाद हा महाराष्ट्राने पाहिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करुन एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेले. यानंतर आता एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांना मी राजकारणात पुढे आणलं होतं असं म्हणत विविध प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तुमच्यात नेमकं फिस्कटलं कुठे या प्रश्नाचंही उत्तर एकनाथ खडसेंनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकनाथ खडसे काय म्हणाले?

२०१४ च्या आधी तुम्ही विरोधी पक्षनेते होतात, त्यामुळे सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे न येता ते देवेंद्र फडणवीस यांना मिळालं याचं वाईट वाटलं नाही का? असं विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले, सरकार यायच्या आधी म्हणजे २०१४ पर्यंत असं काही वाटलं नाही की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध हे फार पूर्वीपासूनचे चांगले संबंध होते. विधानसभेत मी देवेंद्र फडणवीस यांना पुढे आणण्यासाठी मी मदत केली. मी त्यांच्याकडून काही गोष्टी शिकून घेत होतो. आमच्यात उत्तम देवाण-घेवाणही होती. माझ्या बंगल्यावरही ते अनेकदा राहायचे अभ्यास करायचे. त्यावेळी असा काही विषय नव्हता की हा मुख्यमंत्री होणार की तो मुख्यमंत्री होणार. पण साधारणपणे असा प्रघात होता की विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री होणार आहे. त्यात काही गैर नाही. मला आनंद या गोष्टीचा झाला की सरकार आलं. मुख्यमंत्री झालो नाही हे वाटण्यापेक्षा यापेक्षा मी मला आनंद याच गोष्टीचा झाला की चला आपण मंत्री तर होतो आहोत. असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यात फिस्कटलं कुठे?

देवेंद्र फडणवीस आणि तुमचं फिस्कटलं कुठे? असं विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले, आमचं घट्ट नातं होतं, ते फिस्कटलं कुठे ते मला अजूनही समजलेलं नाही. पण काही हलक्या कानांचे असतात, काही जड कानाचे असतात. कधी माझी चूक असेल, कधी ऐकण्यावरुन असेल. एकमेकांविषयी गैरसमज निर्माण झाल्यानंतर ते दूर न करणं असेल. शिवाय कुणाला तरी ते हवं असेल की नाथाभाऊ आणि देवाभाऊंमध्ये फूट पडली पाहिजे. त्यासाठीही काही लोक प्रयत्नशील असतात त्यातून हे सगळं घडलं आहे. असं उत्तर एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मित्र म्हणेच्या नॉन पॉलिटिकल पॉडकास्टमध्ये एकनाथ खडसेंची उपस्थिती होती. त्यात एकनाथ खडसेंनी हे उत्तर दिलं आहे.

शिवसेना भाजपाची युती तोडण्याची घोषणा मलाच करायला सांगितली गेली कारण…

शिवसेना आणि भाजपाची २५ वर्षांची युती तोडण्याचा निर्णय मला जाहीर करायला सांगण्यात आलं होतं. कारण प्रत्येक जण याच्या त्याच्यावर ढकलत होता. मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात त्यामुळे तुम्ही हा निर्णय जाहीर करा. पण नंतर मला पक्षातून हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही विरोधी पक्षनेते आहात त्यामुळे तुम्ही हे जाहीर करा शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. कारण २५ वर्षांपासून अत्यंत घट्ट अशी ही युती होती. मी ती घोषणा केल्यानंतर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते माझ्यावर नाराज झाले की नाथाभाऊंनी युती तोडली. त्यावर मी त्यांना हे सांगितलं की तो पक्षाचा निर्णय होता. युती तोडण्याचा निर्णय नाथाभाऊंनी घेतला नव्हता असंही एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं.