अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा सीडीआर कसा मिळाला ते पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. तसंच त्यांनी सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या टीकेला उत्तरही दिलं. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी असंही सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर कुणी फुल्या मारल्या? याबाबतची माहिती काय आहे? सत्य काय आहे ते समोर आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“अशोक खरातला रुपाली चाकणकरांनी फोन केले. त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरने अशोक खरातला २१७ फोन कॉल केले. १७ कॉल एकनाथ शिंदेंनी केले. त्यातले सहा इनकमिंग सात आऊटगोईंग वगैरे आहेत, तर दीपक केसरकर यांनी काही कॉल केले आहेत अशी माहिती अंजली दमानियांनी दिली. माझे दमानियांवर काही आक्षेप आहेतच आणि ते राहतील. दमानियांनी काहीही स्पष्टीकरण दिलं तरीही माझे आक्षेप जाणार नाहीत. मी आत्ता दमानियांवर फार बोलणार नाही कारण त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहिल. सीडीआर कुणी काढला? ही माहिती समोर आली पाहिजे. दमानियांनी जी माहिती दिली ती माहिती दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्या माहितीवर फोकस करण्याची गरज आहे. अशोक खरातच्या चौकशीचं काय? एकनाथ शिंदे यांचं नाव अंजली दमानिया घेत असतील तर ही गंभीर बाब आहे. एकनाथ शिंदेंची चौकशी एसआयटी करणार का?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.

Rupali Chakankar Resignation news update | Anjali Damania and Sushma Andhare reaction on Chakankar | रुपाली चाकणकर राज्य महिला आयोग राजीनामा | अंजली दमानिया सुषमा अंधारे टीका
रुपाली चाकणकर यांच्यावर अंजली दमानिया – सुषमा अंधारे यांची बोचरी टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

एकनाथ शिंदेंचं नाव समोर आलंय, त्यांची चौकशी केली जाणार का?

अघोरी, तंत्र-मंत्र प्रकरण अशोक खरातच्या अटकेमुळे समोर आलं आहे. हे सगळं प्रकरण महाराष्ट्राला पाच ते २५ वर्षे मागे नेणारं आहे. यामध्ये जर रुपाली चाकणकर यांचं नाव येत असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव येत असेल तर ही बाब गंभीर आहे. एकनाथ शिंदेंनी अशोक खरातला फोन का केले होते? ते समोर आलं पाहिजे. अंजली दमानियांच्या बोलण्यात तथ्य असेल तर त्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. १८ फेब्रुवारीला खरातला अटक झाली. त्यापूर्वी विशेष तपास पथक स्थापन झालं होतं, मात्र या तपास पथकाच्या गतीबाबत मला नाईलाजाने हे प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक दावा करुन त्यांनी नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे.

देवेंद्र फडणवीसांबाबत काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

अशोक खरातच्या या तंत्र-मंत्र प्रकरणात आम्हाला ही माहिती मिळाली आहे की कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारण्यात आल्या. त्यानंतर आम्ही याबाबत खूप माहिती घेतली तेव्हा काही लोक दबक्या आवाजात हे सांगत आहेत की या फुल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर मारल्या गेल्या. या प्रकरणात काय खरं काय खोटं आम्हाला माहीत नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्याइतकी हिंमत जर कुणाची होत असेल तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे. असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.