कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायास काल भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी आक्षेप नोंदवत, सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर आज भाजपाकडून देखील याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. “हिंदूंच्या पूजनीय धर्मग्रंथांविषयी असा अपमानजनक उल्लेख करण्याचे स्वातंत्र्य या वाहिनीला व अमिताभ बच्चन यांना कोणी दिले ?” असा प्रश्न भाजपाकडून विचारण्यात आला आहे.

”अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात अभिमन्यू पवार यांनी रास्त तक्रार करून घटनेनं दिलेल्या अधिकाराचाच उपयोग केलेला आहे. देवी, देवता, धर्मग्रंथ व हिंदूंची श्रद्धास्थाने यावर टीका व अपमान करण्याची हिंमत कोणी करू नये. नाही तर आम्ही धडा शिकवू, हीच भूमिका या मागे आहे.” अभिमन्यु पवार आपले मनःपूर्वक अभिनंदन ! असे भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

“३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात “२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?” असा प्रश्न विचारला गेला होता. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसंच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही”. असं अभिमन्यू पवार म्हणाले होते.

यावर भाजपाकडून सांगण्यात आले की, ”भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्हीवरच्या प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरांच्या ऑप्शनला आक्षेप घेतला आहे. भाजपा विरोधकांनी व पत्रकार जगतातील काही महाभागांनी आपल्या नेहमीच्या सवयीनुसार मूळ आक्षेपाला बाजूला ठेऊन सोयीस्कर नवा वाद उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच, अभिमन्यू पवार यांनी मनुस्मृती विषयी प्रश्न विचारला म्हणून आक्षेप घेतला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मग्रंथाचे दहन केले होते? हा प्रश्न प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तराच्या चार पर्यायांपैकी तीन पर्याय हिंदू धर्मीयांसाठी श्रेष्ठ आणि पूजनीय असलेल्या भगवद्गीता, विष्णुपुराण व ऋग्वेद हे देण्यात आले. मानवी जीवनमूल्ये शिकवणारे व आज संपूर्ण जग ज्या मानव कल्याणाच्या विचाराने प्रेरित होते आहे, ते धर्म ग्रंथ डॉ. आंबेडकर असे काय जाळतील ? डॉ. आंबेडकरांचा संदर्भ देऊन हिंदूंच्या पूजनीय धर्मग्रंथांविषयी असा अपमानजनक उल्लेख करण्याचे स्वातंत्र्य या वाहिनीला व अमिताभ बच्चन यांना कोणी दिले ?” असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.

आणखी वाचा- “…हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग,” मनुस्मृतीसंबंधी प्रश्न विचारल्याने अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार

”अभिमन्यू पवार यांनी अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेल्या तक्रारीचा विपर्यास करत अनेक वृत्तपत्रांनी व न्युज चॅनेल्सनी “मनुस्मृतीबद्दल प्रश्न विचारला म्हणून भाजपा आमदारांची अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात तक्रार” अशा बातम्या प्रसारित केल्या आहेत. यातून बातमी वाचणाऱ्या व पाहणाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. १९२७ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी मनुस्मृतीच्या प्रति जाळल्या हा इतिहास आहे. इतिहास नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अभिमन्यू पवार यांच्या तक्रारीचा आणि २५ डिसेंबर १९२७ च्या घटनेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. पण वृत्तपत्रांनी व न्यूज चॅनेल्सनी चुकीच्या पद्धतीने तक्रारीचा आशय प्रस्तुत केल्याने कथित धर्मनिरपेक्ष, डावे, पुरीगामी आणि बुद्धिजीवी कंपूला भाजपा विरोधात चरायला कुरण मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे काही प्रतिक्रियांवरून दिसून आले.” असे देखील सांगण्यात आले आहे.

“कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या त्या प्रश्नाच्या पर्यायात देशात अनेक धर्म असतानाही हिंदू धर्मीयांसाठी श्रेष्ठ आणि पूजनीय असलेल्या भगवतगीता, विष्णुपुराण व ऋग्वेद ग्रंथांचेच पर्याय का देण्यात आले” हा अभिमन्यू पवार यांचा मूळ आक्षेप आहे आणि तक्रारही त्याच बाबतीत आहे. हिंदू सहिष्णू आहेत म्हणून अशा प्रकारे त्यांच्या भावना दुखावण्याच्या किती प्रयत्नांकडे अजून दुर्लक्ष करायचे म्हणून त्यांनी तक्रार केली आहे. ती एकदम रास्त आहे. भगवद्गीता, विष्णुपुराण आणि ऋग्वेद या धर्मग्रंथांऐवजी समजा कुराण, हदीस, बायबल किंवा या सारख्या अन्य धर्मग्रंथांचा पर्याय दिला असता तर आतापर्यंत देशभर हलकल्लोळ माजवला गेला असता. पुन्हा नवे शाहीनबाग सुरू झाले असते. एका प्रश्नाच्या उत्तरावरून दंगे पेटायला वेळ लागला नसता ! अर्थात त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचाच नव्हे तर कोणत्याच धर्मग्रंथांचा असा अपमान करू नये. हिंदू सहिष्णू असल्याने व तीव्र प्रतिक्रिया देत नसल्याने यावे त्याने टपली मारून जावे, कितपत उचित आहे ?” तसेच, ”२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. पुढे आपण संविधानाच्या रूपाने भीमस्मृती स्वीकारली आहे. संविधानावर सर्वांची निष्ठा असायलाच हवी. परिणामी मनुस्मृती आपण नाकारली आहे. पण त्या घटनेचा आधार घेऊन भगवतगीता, विष्णुपुराण व ऋग्वेद या ग्रंथांची अवहेलना करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अगदी महानायकालाही.” असे देखील भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.