Ketan Agarwal Pune Real Estate director murder update: अपघात झाल्याचा बनाव रचून सिया गोयल या २० वर्षी तरुणीने तिच्या होणाऱ्या पतीची दरीत ढकलून हत्या केली. या हत्येत तिला तिच्या प्रियकराने चेतनने मदत केली. पोलिसांना वेळीच या अपघातावर संशय आल्याने या हत्येचा उलगडा होऊ शकला. दरम्यान, उच्चशिक्षित असलेल्या केतनची हत्या सियाने का केली, याचा अधिक तपास पोलीस घेत आहेत.
सिया आणि केतन यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. तर, यावर्षी त्यांचं लग्न होणार होतं. या लग्नासाठी त्यांनी राजस्थानमधील एक राजवाडाही कोट्यवधी रुपयांना बुक केल्याची माहिती विविध माध्यमातून समोर आली. तर, पाहुण्यांसाठी दोन खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. हे दोघे प्री वेडिंग शूटसाठी बालीला जायलाही निघाले होते. मात्र, पासपोर्ट हरवल्याने त्यांना माघारी परतावं लागलं. मात्र, केतनची आता हत्या झाल्यानंतर एका मागून एक अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.
सियाला बालीला जायचं नव्हतं. त्यामुळे तिने केतनचा पासपोर्ट चोरला अन् तो हरवला असल्याचा बनाव केला. त्यामुळे पासपोर्ट न मिळाल्याने त्यांना त्यांची बालीची ट्रीप रद्द करावी लागली. त्यानंतर १४ जून रोजी हे जोडपं लोहगड ट्रेकवर गेलं होतं. याच दिवशी तिने पहिल्यांदा केतनच्या हत्येचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा तिने प्रयत्न करायचं ठरवलं. त्यानुसार, तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच म्हणजेच १८ जून रोजी तिने केतनला लोहगडला नेलं. त्या दोघांपाठोपाठ सियाचा प्रियकर चेतनही आला होता. या दोघांनी थंड डोक्याने हत्येचा कट रचून केतनला खोल दरीत ढकललं अन् तो फोटो काढताना पाय घसरून पडला असा बनाव रचण्यात आला. पण पोलिसांच्या तपासातून या हत्येचा उलगडा होऊ शकला.
केतन अग्रवाल कोण?
दरम्यान, २६ वर्षीय केतन हा पुण्यातील रहिवासी होता. त्याच्या लिंक्डइन बायोनुसार, बॅबसन एफ.डब्ल्यू. ओलिन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस (Babson F.W. Olin Graduate School of Business) मधून एंटरप्रेन्योरशिप या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी त्याने घेतली होती. तसंच त्याने सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधून बीबीएची पदवीही घेतली होती. तो पर्यावरण शाश्वतता आणि नवनवीन संशोधनासाठी कार्यरत होता. तो अशा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत होता जे केवळ आर्थिक विकासाला चालना देत नाहीत, तर पर्यावरणपूरक (हरित) भविष्यासाठीही योगदान देतात.
तर, सध्या तो सक्सेस ग्रुप या त्यांच्या कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायात संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी (CMO) म्हणून कार्यरत होता. ही माहिती सक्सेस ग्रुपच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्पष्ट झाली आहे.
