मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात १० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज अखेर त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, हे उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन सुरूच राहिल हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ जालना जिल्ह्याच्या वडीगोद्री येथे उपोषण करून प्रा. लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून पुढे आले आहेत. मराठा आरक्षणासाठी जालन्यातीलच अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रतिवाद म्हणून त्यांच्या आंदोलनाकडे बघितलं जाऊ लागलं आहे. विशेष म्हणजे प्रा. लक्ष्मण हाके ज्या ठिकाणी उपोषणाला बसले तिथून अंतरवाली सराटी केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान, लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत? आणि त्यांची आजवरची कारकिर्द कशी राहिली आहे, याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा – “ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही”, सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित!

कोण आहेत लक्ष्मण हाके?

लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून ते धनगर समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे आहेत. २००३ साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पाच वर्ष नोकरीही केली. शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी उसतोडणी कामगार म्हणूनही काम केलं. त्यांच्या पत्नी विद्या हाके या सध्या पुण्याच्या व्हीआयटी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

जानेवारी २०२१ मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

याशिवाय लक्ष्मण हाके यापूर्वी निवडणुकीच्या रिंगण्यात देखील उतरले आहेत. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढे ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत माढा मतदारसंघातून धर्यैशील मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

हेही वाचा – लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यांना…”

२०१९ मध्ये त्यांनी ओबीसी संघर्ष सेना नावाची संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनेदेखील केली. “मी ओबीसी बाधवांना सांगू इच्छितो की महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर तुमचे आरक्षण वाचवण्यासाठी परतणार नाहीत. त्यामुळे आपण एकत्र येऊन आंदोलन टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हाके यांनी नुकताच उपोषणादरम्यान केलेल्या भाषणात म्हटले होते.