Who is Manisha Gurunath Mandhare and what is her role in NEET 2026 paper leak case? : नीट युजी २०२६ पेपर फुटी प्रकरणाच्या चौकशीला वेग आला असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातील प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या शहरांतून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मनीषा मांढरे नक्की कोण? तिचा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीशी थेट संबंध कसा? हे जाणून घेऊयात.
मनीषा मांढरे कोण?
सीबीयाने दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे पुण्याच्या शिवाजी नगर भागातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात २०२० पासून कार्यरत आहे. तर, गेल्या २४ वर्षांपासून ती अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्राचे अध्यापन करत आहे. मांढरेचा अनुभव लक्षात घेता तिला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट परीक्षेसंदर्भातील गोपनीय कामकाजासाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे परीक्षांसंदर्भातील अनेक गोपनीय माहिती तिच्याकडे होती.
एनटीएशी थेट संबंध काय?
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार मनीषा मांढरेला वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशात्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांची थेट माहिती होती. म्हणजेच, ३ मे २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेपूर्वी, नीट युजी २०२६ परीक्षेसाठी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांचे प्रश्न तयार करण्यात मांढरेचा सहभाग होता, असं सीबीआयने म्हटलं आहे. परीक्षा प्रणालीतील तिच्या याच भूमिकेमुळे गोपनीय जीवशास्त्र (Biology) विषयांचे प्रश्न तिला आधीच मिळाले असावेत, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मांढरेच्या पुण्यातील निवासस्थानी विशेष कोचिंग सत्रे आयोजित करण्यात आली होती. या सत्रांदरम्यान, विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न वह्यांमध्ये लिहून पाठ्यपुस्तकांमध्ये खुणा करण्यास सांगितले जात होते.
तपास अधिकार्यांचा असा दावा आहे की, एप्रिल २०२६ दरम्यान मांढरेने या प्रकरणातील दुसरी आरोपी मनीषा वाघमारे (जिथे आधीच अटक झाली आहे) हिच्या माध्यमातून काही ठराविक नीट उमेदवारांची निवड केली होती. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून आलेल्या तक्रारीनंतर, सीबीआयने १२ मे २०२६ रोजी या प्रकरणाची अधिकृतपणे नोंद केली. फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार आहे. उमेदवारांना अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
महाविद्यालयाने काय म्हटलं?
“मांढरेला अटक झाल्याची बाब अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या प्रकरणाची संस्था आणि महाविद्यालय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१’ कायद्यातील तरतुदींनुसार संबंधित शिक्षिकेविरोधात आवश्यक ती चौकशी प्रक्रिया राबवण्यात येईल. तसेच, नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल’, असं स्पष्टीकरण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी दिले.
