Ravindra Dhangekar Vs Navnath Ban : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यातच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (शिंदे) पक्षावर महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केल्याने चांगलंच राजकारण तापलं आहे.
या घडामोडी दरम्यानच भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात ‘शाब्दिक वॉर’ आणि ‘ट्विटर वॉर’ रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आज रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत नवनाथ बन यांना डिवचलं आहे. त्यानंतर नवनाथ बन यांनीही रवींद्र धंगेकर यांच्याबाबत एक पोस्ट शेअर करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
रवींद्र धंगेकरांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
“ही याची ला## आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला. अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नस## होईल हे तुला कळणार सुद्धा नाही”, अशी पोस्ट रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र, त्यांच्या पोस्टचा रोख हा बन यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.
रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक कार्टून स्टाइल फोटो असून त्यामध्ये भाजपाचं कार्यालय आणि भाजपाचं चिन्ह कमळ दाखवण्यात आलेलं आहे. तसेच एक व्यक्ती त्या कार्यालयाच्या दारातच कुत्र्याला पाव खाऊ घालत आहे अशा आशयाची ही पोस्ट धंगेकर यांनी शेअर केली आहे.

नवनाथ बन यांनी काय म्हटलं?
नवनाथ बन यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काय म्हणतात पुणेकर, रंग बदलू धंगेकर”, असं म्हणत नवनाथ बन यांनी धंगेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच नवनाथ बन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक कार्टून स्टाइल फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी आतापर्यंत बदललेल्या पक्षाचा उल्लेख करणारा आशय दाखवण्यात आला आहे.

Who is Navnath Ban: नवनाथ बन कोण आहेत?
Who is Navnath Ban: नवनाथ बन हे माजी पत्रकार आणि भाजपाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत. नवनाथ बन यांना मुंबईच्या वॉर्ड क्र.१३५ मधून भाजपाने उमेदवारी दिली होती आणि त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. भाजपाकडून अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी नवनाथ बन एक आहेत. नवनाथ बन हे ८५७८ मतांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होत ते नगरसेवक बनलेले आहेत. सध्या ते विविध मुद्यांवर पक्षाची आक्रमकपणे बाजू मांडताना दिसत आहेत.
