TCS Nashik Case : नाशिकच्या टीसीएसच्या बीपीओमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक छळाचं प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण हादरवून टाकणारं आणि धक्कादायक आहे. टीसीएसच्या बीपीओत धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं आहे. २० वर्षांच्या हिंदू मुलगी रमझानचे उपवास करत असल्याची माहिती समोर आली आणि मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास सुरु केला. त्यानंतर या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात निदा खानला अटक करण्यात आली आहे. निदा खान या प्रकरणाची मास्टरमाईंड होती का? असा प्रश्न आता विचारला जातो आहे.

निदा खानला पोलिसांनी केली अटक

निदा खान हे या प्रकरणातलं प्रमुख नाव आहे. निदा खान जी टीसीएसच्या बीपीओमध्ये एच आर मॅनेजर या पदावर कार्यरत होती. या प्रकरणात ९ आरोपींना अटक झाली, मात्र निदा खान सापडत नव्हती. आता तिलाही अटक करण्यात आली आहे. निदा खानच्या चौकशीत काय काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळाचे आरोप आणि धर्मांतरासाठी मत बदललं जात असल्याच्या प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी केल्या. मात्र त्याकडे निदा खानने सपशेल दुर्लक्ष केलं असाही आरोप तिच्यावर आहे. तसंच ती नव्या महिला कर्मचाऱ्यांना मुसलमान पुरुष सहकाऱ्यांशी संपर्कात आणत होती त्यामुळे ती या प्रकरणाची मास्टरमाईंड आहे का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

कोण आहे निदा खान?

निदा खान ३० वर्षीय महिला आहे, ती नाशिकच्या टीसीएस बीपीओमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करत होती.

निदा खानचं मुख्य काम महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करणं हे होतं.

निदा खानवर असलेली आणखी एक जबाबदारी म्हणजे POSH चे नियम पाळले जात आहेत ना? कार्यालयीन लैंगिक छळाला कुठल्या महिलेला सामोरं जावं लागत नाहीये ना? हे पाहणंही होतं.

निदा खानने पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. ती या विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे.

नाशिकच्या टीसीएस बीपीओ युनिटमध्ये ती सुरुवातीला एचआरच्या पोस्टवर लागली होती. त्यानंतर तिने मॅनेजर पदावर बढती मिळवली.

जानेवारी २०२६ ला निदा खानने नाशिक सोडून पुण्याला बदली करुन घेतली होती.

निदा खानवर धर्मांतरणासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप

तपासकर्ते आणि पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान फक्त तक्रारींकडे दुर्लक्ष करत नव्हती. तर ती महिला कर्मचाऱ्यांशी दोस्ती करायची, त्यांना नमाज पठण कसं योग्य आहे ते सांगायची. तसंच हिजाब घालणं, मुस्लिम धर्मातल्या धार्मिक प्रथा कशा चांगल्या आहेत हे ठसवत होती.

TCS Nashik Case
नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणात ९ जणांना अटक (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

निदा खानवरचे इतर आरोप काय आहेत?

पीडितांचं हे म्हणणं आहे की निदा खानला ऑफिसमध्ये होत असणाऱ्या लैंगिक छळाबाबत आम्ही एकूण ७८ इमेल केले होते. त्यापैकी तिने कशाचीही दखल घेतली नाही.

तक्रार करणाऱ्यांपैकी एका महिलेला उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात येऊ दिलं नाही. त्यांना तसा सल्लाही दिला नाही.

निदा खानकडे तक्रार केली की अशा प्रकारच्या गोष्टी कॉर्पोरेटमध्ये होत असतात असं उत्तर ती द्यायची असंही काही पीडित महिलांनी सांगितलं.

निदा खान या प्रकरणाची मास्टरमाईंड आहे असं तपासकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण तिने पुरुष सहकाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना पाठिशी घातलं.

महिला कर्मचाऱ्यांनी नेमके काय आरोप या प्रकरणांत केले आहेत?

अशोभनीय व्यवहार : चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, अश्लील गोष्टी करणे, द्वियर्थी बोलणे या गोष्टी ऑफिसमध्ये होत होत्या.

दबावाचं राजकारण : आम्ही ज्या पुरुष सहकाऱ्यांची तक्रार केली. त्यानंतर आम्हाला दबावाच्या राजकारणाचा सामना करावा लागला. आम्हाला जास्त काम देण्यात आलं. नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देणं.

एचआरची निष्क्रियता : पीडितांचं म्हणणं आहे की आम्ही एचआरला या संदर्भातल ७८ इमेल लिहिले होते. पण एचआर मॅनेजर निदा खानने काहीही ठोस पावलं उचलली नाहीत. उलट आमच्यावर दबाव आणला.

आरोपींपैकी बहुतांश टीम लीडर किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी टीम लीडर किंवा तशा वरिष्ठ पदावर कार्यरत होते. ज्या पीडितांना या रॅकेटमध्ये ओढण्यात आलं त्यांचं वय १८ ते २५ आहे. तर त्यांचं मासिक उत्पन्न हे १८ ते २५ हजार रुपये इतकं आहे.

चंद्रशेखरन यांचं निवेदन काय?

नाशिक पोलिसांनी समोर आलेल्या तक्रारी आणि आरोप अतिशय चिंताजनक आणि वेदनादायी आहेत. कंपनीने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध आधीच कारवाई सुरू करण्यात आली असून कंपनी तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. कंपनीकडे कोणत्याही प्रकारच्या जबरदस्ती किंवा गैरवर्तनाबाबत शून्य-सहिष्णुता धोरण आहे. सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी आणि जबाबदार व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. TCSच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यम या तपासाचे नेतृत्व करणार आहेत. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.