अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? विधी मंडळाचा नेता म्हणून कुणाची निवड होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात अजित पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष पटेल असू नये असं म्हटलं होतं. संजय राऊत यांनीही याच पद्धतीचं विधान करत अजित पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष जाधव, पाटील, कांबळे कुणीही असावा असं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता प्रफुल्ल पटेल यांनी संताप व्यक्त करत कोण राज ठाकरे वाकरे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रफुल पटेल यांनी अध्यक्षपदाबाबत काय म्हटलं आहे?

आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीप्रमाणे होईल. आम्ही सगळेच योग्य निर्णय घेऊ. आम्ही सुनेत्रा पवार यांच्याबाबत निर्णय घेतला आहे. त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. पक्षाचाही निर्णय लवकरच घेतला जाईल. बाहेरचे सगळे लोक आमच्या पक्षाबाबत काय बोलत आहेत? ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही असे लोक का बोलत आहेत? १९५२ पासून माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं. मलाही निवडणुकीत लोकांनी निवडून दिलं. आमच्या बद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कुणी कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून बसलो आहे. पक्षाचा निर्णय योग्य दिशेने होईल, योग्य व्यक्तीचा होईल आणि माझ्या शिवायच होईल. अजून काय सांगायचं आहे? असा सवाल प्रफुल पटेल यांनी केला आहे.

राज ठाकरेंचा काय संबंध?

आम्ही काहीही बोललो नाही, तरीही आमच्या पक्षात संशय निर्माण करणं हे घाणेरडं राजकारण आहे, आम्ही आमचा योग्य निर्णय घेणार आहोत. माझ्या शिवायच योग्य व्यक्तीला निवडलं जाईल हे स्पष्ट सांगतो आहे. जी जबाबदारी माझ्यावर ती पार पाडतो आहे. राज ठाकरे वाकरे माझ्या पक्षाचे आहेत? त्यांनी ठरवायचं आहे का? की माझ्या पक्षाचा नेता कोण? आम्ही राज ठाकरे किंवा सकाळी ९ चं बुलेटीन वगैरे किंवा तेलंगणाचा कुणी आहे त्यांनी आम्हाला काही सांगू नये.

राज ठाकरेंनी काय पोस्ट लिहिली होती?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! ही पोस्ट राज ठाकरेंनी ३१ जानेवारीला लिहिली होती. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.