scorecardresearch

‘सनी नलावडे कोण आहे, त्याची माहिती घेणार’; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीनंतर आमदार साळवी यांचे विधान

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार साळवी यांना मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती.

‘सनी नलावडे कोण आहे, त्याची माहिती घेणार’; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीनंतर आमदार साळवी यांचे विधान
आमदार राजन साळवींची लाचलुचपत विभागाकडून साडेचार तास चौकशी

शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या पाठोपाठ राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. साळवी यांच्या बेकायदेशीर मालमत्तांची रायगडच्या लाचलुचपत विभागाने बुधवारी चौकशी सुरु केली आहे. तब्बल साडेचार तास सुरु असलेल्या या चौकशीनंतर साळवी लाचलुचपत विभागातून बाहेर आले. सनी नलावडे नामक खेड तालुक्यातील लोटे येथे राहणाऱ्या व्यक्तीने माझ्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. ही व्यक्ती कोण आहे. त्या व्यक्तीने माझ्या मालमत्तेची चौकशी करा, अशी मागणी का केली याची आमच्या पध्दतीने माहिती घेणार असल्याचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- आमदार राजन साळवींची लाचलुचपत विभागाकडून साडे चार तास चौकशी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मी आज माझ्या विरोधात तक्रार कोणी केली याची विचारणा केली. मात्र अधिकाऱ्यांनी ठाणे कार्यालयातून आम्हाला आपल्या मालमत्तेच्या उघड चौकशीचे आदेश प्राप्त झाल्याचे सांगत तक्रारदाराचे नाव सांगण्यास असमर्थता दर्शवली. पण मी काढलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे येथे राहणाऱ्या सनी नलावडे नामक व्यक्तीने माझ्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती मी देणार आहे. पण हा सनी नलावडे कोण आहे. त्यांची चौकशी मी करणार आहे. आणि सामान्य नागरीक म्हणून काही जणांच्या मालमत्तेची चौकशी करा असे पत्र मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देणार आहे. मग हा विभाग त्या व्यक्तींची चौकशी करणार का हे मला पहायचे आहे असेही साळवी यांनी चौकशीनंतर पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

हेही वाचा- VIDEO: “ज्यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाची शिफारस केली, त्यांनीच पुरस्काराला विरोध केला”, सदानंद मोरेंचा मोठा दावा

माझ्या नावावर माझ्या कुटूंबियांच्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तांची माहिती मी दिली आहे. जी माहिती माझ्याकडे होती ती सर्व दिली आहे. मात्र त्यांना अधिक सविस्तर माहिती हवी आहे. त्यासाठी मला सहा फॉर्म भरून देण्यास सांगितले आहे. हे फॉर्म भरून देण्यासाठी मी २० जानेवारी पर्यंतची मुदत मागितली आहे. ती वकील आणि लेखापरीक्षकांमार्फत भरून देण्याचे आश्वासित केले आहे. त्यांना गोवा आणि मुंबईतील ओशीवारा येथे माझी मालमत्ता असल्या बाबतची विचारणा मला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली. पण तशी कुठलिही मालमत्ता माझ्याकडे नाही हे त्यांना स्पष्ट सांगितल्याचे साळवी यांनी सांगितले. माझा न्यायदेवतेवर आणि लोकांवर विश्वास आहे. त्यामुळे या संपूर्ण चौकशीला मी ठामपणे सामोरे जाईन असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 19:04 IST

संबंधित बातम्या