“MPSC वर आपलं प्रेम होतं.. होतं की नव्हतं? आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण आपल्या प्रेयसीच्या हाताचं चुंबन घेतो. MPSC चंही आपण चुंबन घ्यायला तयार होतो. पण काय झालं? हम उसका हात चुमने की ख्वाहिश में जिंदा थे, लेकिन वो किसी का गाल चुमके आयी.” “चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही.”

ही वाक्यं कुठल्या शायर किंवा कवीची नाहीत. ही वाक्य आहेत MPSC चं आंदोलन मागील आठ दिवसांपासून गाजवणाऱ्या विवेकानंद पाटील या विद्यार्थ्याची. रोहित पवारांच्या नेतृत्त्वात पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनात आलेला हा कोल्हापूरचा विद्यार्थी मागील आठ दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आपल्या भाषणाची खास पद्धत, उपस्थितांना आकर्षून घेण्याची त्याची शैली ही चर्चेचा विषय ठरली आहे. आपण जाणून घेऊ विवेकानंद पाटील नेमका आहे तरी कोण?

कोण आहे विवेकानंद पाटील?

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील माजगावचा विवेकानंद मारूती पाटील याने त्याच्या भाषणाच्या खास शैलीने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. एमपीएसी आयोगाचे वाभाडे काढत तो आपल्या खास कोल्हापुरी शैलीत जे ठसकेबाज भाषण करतो त्यामुळे लाखो तरूणांकडून त्याचं कौतुक होतं आहे. विवेकानंद पाटील याने कुरूकली येथील भोगावती महाविद्यालयातून दोन वर्षांपूर्वी राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच विवेकानंद पाटीलने MPSC च्या अभ्यासाला सुरूवात केली होती. आत्तापर्यंत त्याने दोनदा ही परीक्षा दिली आहे. मराठी भाषेवर त्याची चांगली पकड आहे. तसंच आपल्या भाषणात तो कवितांचे दाखलेही देतो, शेरोशायरीही म्हणतो. त्यामुळे तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. MPSC चं आंदोलन त्याने त्याच्या भाषणांनी गाजवलं आहे यात शंकाच नाही. विवेकानंद पाटीलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विवेकानंद पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची बहीणही एमपीएससी तयारी करते आहे.

Vivekanand Patil News
विद्यार्थ्यांच्या गराड्यात भाषण करणारा विवेकानंद पाटील (फोटो-सोशल मीडिया)

आपल्या खास शैलीत तो भाषण करतो

विवेकानंद पाटील म्हणाला, ५० लाख रूपये देऊन वशिल्याने नोकऱ्या विकत घेण्याची आमची कुवत कुठे? आमदार फुटले, खासदार फुटले, पक्षही फुटले, त्याचं दुःख झालं नाही. पण एमपीएसीचा पेपर फुटला तेव्हा आम्हाला वाटलं की आभाळच फुटलं. आता बालवाडीचा पेपर फुटल्याची वेळ येऊ नका अशी टोलेबाजी त्याने केली. या त्याच्या खास आणि थेट बोलण्याच्या शैलीने उपस्थितांना तो आपलंसं करून घेतो. MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतला जाणं किंवा त्यांनी तो देणं आवश्यक आहे. मराठीत भाऊसाहेब पाटणकर नावाचे शायर आहेत, ते म्हणतात आग आहे इश्क उपमा काय दुसरी द्यायची, बांधवानो पेटून यात राख होऊ नाही द्यायची. त्यामुळे MPSC वर प्रेम करायला काही हरकत नाही हे लक्षात ठेवा. असंही तो सांगतो.