महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदावर भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाली. महाविकासआघाडीकडून उभे असलेले शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना पराभूत करून राहुल नार्वेकरांनी विजय मिळवला. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना १६४ मतं, तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर हे आतापर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचं म्हटलं. याच राहुल नार्वेकर यांच्या राजकीय जीवनाचा हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यवसायाने वकील असणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीला शिवसेनेत काम केलं. आदित्य ठाकरे आणि त्यांचे निकटचे संबंध होते. यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना विधान परिषदेवर पाठवलं.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर

२०१४ ते २०१९ या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात नार्वेकर यांना ‘उत्कृष्ट भाषणा’साठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा पुरस्कार मिळाला. त्यांनी मे २०१६ मध्ये राष्ट्रकूल संसदीय मंडळ शाखेद्वारे ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड व सिंगापूरचा अभ्यास दौराही केला.

सप्टेंबर २०१९ मध्ये राहुल नार्वेकरांचा भाजपात प्रवेश

सप्टेंबर २०१९ मध्ये राहुल नार्वेकर यांनी भाजपात प्रवेश केला. ते भाजपाचे माध्यम प्रभारीही (मीडिया इनचार्ज) राहिले आहेत. ते ऑक्टोबर २०१९ मध्ये ते कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून गेले. कुलाबा मतदारसंघात एकूण २ लाख ६६ हजार ५८७ मतं आहेत. यापैकी १ लाख ६ हजार ६३० मतदारांना आपला मताचा हक्का बजावला.

भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत ५७ हजार ४२० मतं मिळाली, काँग्रेसचे अशोक जगताप यांना ४१ हजार २२५ मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या जितेंद्र कांबळे यांना केवळ ३ हजार ११ मतं मिळाली होती.

अजित पवार राहुल नार्वेकरांविषयी काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, “राहुल नार्वेकर पूर्वी शिवसेनेत होते. त्यावेळी माझ्या कानावर आलं होतं की आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी आदित्य ठाकरेंना कायद्याचं बरंच ज्ञान आदित्य ठाकरे यांना देण्याचा प्रयत्न केला. आम्ही देखील अशा लोकांवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे मला मावळ लोकसभा मतदारसंघात अभ्यासू व सुशिक्षित उमेदवार पाहिजे होता.”

“दुर्दैवाने मोदींची लाट असल्याने मी-मी म्हणणारे पराभूत झाले”

“लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुल नार्वेकर यांना विनंती केली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झाले. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने मी-मी म्हणणारे पराभूत झाले. त्यात आमचे उमेदवार राहुल नार्वेकरही पराभूत झाले,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“राहुल नार्वेकर फार हुशार आहेत”

अजित पवार पुढे म्हणाले, “राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगितलं मी उमेदवार होईन पण मला अपयश आलं तर मला कुठं तरी सदस्य केलं गेलं पाहिजे. तेव्हा त्यांना विधान परिषदेचं सदस्यपद मिळालं. तेथे त्यांनी उत्तम काम केलं. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केलं. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.”

हेही वाचा : “मला एका गोष्टीचं खूप कौतुक, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर…”; अजित पवारांच्या टोलेबाजीवर एकच हशा

“नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या जवळ जातात”

“मला एका गोष्टीचं खूप कौतुक आहे. राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या खूप जवळ जातात. शिवसेनेत असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांना आपलसं केलं. राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी मला आपलंसं केलं. आता भाजपात गेल्यावर देवेंद्र फडणवीसांना आपलंसं करून टाकलं. त्यांनी कुठलीच हयगय केली नाही. आता एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना आपलंसं करून घ्यावं. नाहीतर त्यांचं काही खरं नाही,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is youngest maharashtra assembly president rahul narwekar pbs
First published on: 03-07-2022 at 18:56 IST