Devendra Fadnavis On Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं असून त्याची एसआयटीद्वारे चौकशी सुरू आहे. याच अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केले होते. अशोक खरातला कोणी किती कॉल केले? याची यादीच अंजली दमानिया यांनी नुकतीच वाचून दाखवली होती.
याबाबत बोलताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणी लीक केले? याची राज्य सरकार चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस सीडीआरबाबत काय म्हणाले?
“अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर लीक कसा झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
खरात प्रकरणात आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले?
“अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत आणि दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एसआयटी रोज काय तपास करते हे रोजच सांगता येणार नाही. पण एसआयटी योग्य वेळी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देईल”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
अशोक खरातला कोणी किती कॉल केले? अंजली दमानियांनी काय आरोप केले होते?
अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं की, “रुपाली चाकणकर यांचे एकूण १७७ कॉल अशोक खरातला झाले आहेत. तसेच त्यांच्या बहिणीचेही २३६ कॉल खरातला झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल १७ कॉल्स अशोक खरतला झाले. या १७ कॉल्सपैकी १० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग कॉल होते. या कॉलमध्ये सर्वाधिक वेळ २१ मिनिटे त्यांच्या संभाषण झालं. शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीचे खरातला १७ कॉल झाले असतील तर याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी देणं गरजेचं आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचे खरातला ८ कॉल, तर सुनील तटकरे यांचे ८ कॉल झाले आहेत आणि आशिष शेलार यांचाही एक कॉल आहे. हे मी फक्त फोन कॉलबाबत सांगितलं. अशोक खरातबरोबर सर्वाधिक कोन बोललं असेल तर त्यामध्ये दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर या आहेत. ३३ हजार ७२७ सेकंद रुपाली चाकणकर या खरातशी बोलल्या आहेत”, असे आरोप अंजली दमानिया यांनी केले होते.
