विदर्भ साहित्य संघाच्या भूमिकेकडे लक्ष
८९व्या मराठी साहित्य संमेलनातील पाचही उमेदवारांनी नावे जाहीर करून ही निवडणूक पंचरंगी होणार असल्याच्या खुणा दिसत असल्या तरी विदर्भ साहित्य संघ ज्या उमेदवाराच्या बाजूने उभा राहील, याचेच पारडे जड असते, अशी आजवरची प्रथा आहे. ही प्रथा यावेळीही कायम राहणार असल्याचे संकेत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, प्रकाशक-लेखक अरुण जाखडे, प्रसिद्ध लेखक शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर, अशी निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांची नावे आहेत. यातील वाघ, जाखडे, लिंबाळे आणि सबनीस ही परिचित नावे असून, श्रीनिवास वारुंजीकर बहुतेकांसाठी नवीन आहेत. बाकीच्यांच्या तुलनेत आपण कुठेच नाही, असे माहिती असूनही कदाचित चर्चेत राहण्यासाठी त्यांनी अर्ज भरला असावा, असाही विदर्भ साहित्य संघाशी संबंधितांचा कयास आहे. तरीही चौकोनी लढतीत कोण निवडून येतो त्यापेक्षा विदर्भ साहित्य संघ कोणाच्या पाठीशी उभे राहतो, हा प्रश्न आहे. उमेदवाराचे वैदर्भीय असण्याच्या निकषाला विदर्भ साहित्य संघ हातभार लावू शकतो.
एकगठ्ठा मते देण्यासाठी संघ प्रसिद्ध आहे. संघाच्या या भूमिकेमुळे काहींचा पोटशूळ उन्मळून येत असला तरी यंदाही हा पायंडा मोडला जाईल, अशी कुठलीही चिन्हे नाहीत. एकगठ्ठा मते उमेदवाराच्या पारडय़ात टाकण्याची रीत यंदाही कायम राहील. तरीही संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर म्हणतील तीच पूर्वदिशा राहील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या संदर्भात वैदर्भीय असणे उमेदवाराला फायदेशीर ठरू शकते का? असे त्यांना विचारले असता या प्रश्नातच माझे उत्तर दडले आहे, असे म्हैसाळकर म्हणाले. आता कुठे पत्रिका यायला सुरुवात झाली आहे. काहींच्या घरी त्या येऊन पडल्या असतील. संमेलनाचे सोपस्कार उरकायला अजून एक महिना वेळ आहे. या विषयावर आमची बैठक झालेली नसून सर्व ज्येष्ठ मंडळी एकत्र बसून विचार जाणून घेतो. काहींना पुण्या-मुंबईचे आकर्षण असतेच. तरी एकेरी मते देण्यावर आमचा भर असतो. त्यात आमची एकी, धाक असतो. हा धाक सर्वाना मानवतोच, असे नाही, असेही ते म्हणाले.