लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांच्या अस्तित्वाची मानली गेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार, याची सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे होत असताना दुसरीकडे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यावर मोठ्या प्रमाणावर पैजाही लागल्या आहेत. काहीजणांनी चक्क मेंढ्याची पैज लावली आहे. काहीजणांनी तब्बल ११ बुलेट गाड्यांची तर काहीजणांनी थेट थर मोटारीपर्यंत लावलेली पैज हा चर्चेचा विषय झाला आहे.

माढा तालुक्यातील योगेश पाटील आणि नीलेश पाटील या भावंडांनी माढ्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांची ‘तुतारी’ जोरात वाजणार म्हणून चक्क ११ नव्या बुलेट गाड्यांची पैज जाहीर करून भाजप समर्थकांना आव्हान दिले आहे. मात्र हे आव्हान भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कोणीही समर्थकांनी अद्यापि स्वीकारले नाही. योगेश पाटील आणि नीलेश पाटील हे भावंड धैर्यशील मोहिते-पाटील यांचे समर्थक आहेत. माढ्यातून मोहिते-पाटील हेच भाजपला रोखतील आणि लोकसभेत निवडून जातील, असा पाटील बंधुंनी आत्मविश्वास बाळगला आहे. त्यातूनच त्यांनी ११ बुलेट गाड्यांची पैज जाहीर केली आहे.

आणखी वाचा-“तोंडावर कधीच आपटलेत, आता त्यांची तोंड फुटतील”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आपले हे आव्हान स्वीकारून म्हणजेच धैर्यशील मोहिते-पाटील हे पराभूत होणार म्हणून कोणी पैज लावेल, ते दोघेही बुलेट गाड्यांच्या शोरूममध्ये जाऊन बुलेट गाड्यांची मागणी नोंदवून त्यांची किंमत भरायची. यात जो विजेता होईल, तो ११ बुलेट गाड्यांचा मालक होणार. ही पैज नोटरीवर रीतहार ठरवली जाईल, असे पाटील बंधुंनी सांगितले. बाजारात एका नवीन बुलेट गाडीची किंमत दोन लाख ७५ हजार रूपये आहे. त्यानुसार ११ बुलेट गाड्यांची एकूण किंमत ३० लाख २५ हजार रूपये एवढी आहे. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराजसिंह निंबाळकर यांनी त्याही पुढे जाऊन महागड्या थार मोटारीची पैज जाहीर केली आहे. त्यांचीही पैज स्वीकारण्यासाठी कोणीही पुढे आला नाही.

दुसरीकडे माढ्यात कोण बाजी मारणार, यावर बुलेट गाडीसह चक्क मेंढ्याचीही पैज लावण्यात आली आहे. या पैजांमुळे माढ्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची रंगतदार चर्चा सुरू आहे. चुरशीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये हारजितीवर पैजा घोषित करून त्या प्रत्यक्षात कृतीत आणणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. अशा पैजा लावणे हा जुगाराचा भाग मानला जातो. सांगलीमध्ये पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे.