Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. १५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसंच शिवप्रेमीचं आकर्षण केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान या प्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमांचा यात समावेश आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले आढळले आहेत.
पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरीक आणि पर्यटकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने २० ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं की, गंजलेल्या नट आणि बोल्टमुळे पुतळ्याच्या स्थिरतेला धोका निर्माण झाला होता, तरीही इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पुतळ्यासाठी वापरलेले स्टील गंजले
पुतळा बनवताना वापरलेले स्टील गंजू लागले होते. पुतळ्याला गंज लागल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने नौदलांच्या अधिकाऱ्यांना दिली होती. तसंच, या संदर्भात पावलं उचलण्याची विनंतीही केली होती, असं सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितंले.
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची
या पुतळ्याची उभारणी कोणी केली, यावरून सोमारी दिवसभर चर्चा सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारल्याचा दावा करत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसह मालवण येथील या विभागाच्या कार्यालयात जाऊन मोडतोड केली. मात्र, या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे होती, असा दावा राज्य सरकारने केला. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची असल्याचाही दावा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत आणि अस्मिा आहे. पुतळ्याचा आराखडा व उभारणी नौदलाने केली होती. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.