पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आहे ते सगळ्यांनी गांभीर्याने घ्यावं-शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं त्याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी विनंती केली की प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे. अशा वेळेला देशातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली गेली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित रहावं. याआधी विविध मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठका झाल्या पण पंतप्रधान नव्हते. कधी राजनाथ सिंह होते, कधी आणखी कुणी होते. देशावर किती गंभीर परिणाम होईल हे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहिलं पाहिजे.

Sharad Pawar
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर उत्तरं दिली आहेत (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

राहुल गांधींबाबत मुख्यमंत्र्यांनी वापरलेले शब्द योग्य नाहीत-पवार

आज सकाळपासून मी पाहतोय कुणी मोटरसायकलवरुन जातोय, कुणी चालत ऑफिसला जातो आहे. एका मंत्र्याने जाहीर केलं आहे की मी मंत्री आहे पण मी कार कमी केल्या. सतरा कार होत्या त्यावरुन आम्ही आठवर आलो आहेत. मुळात १७ कार का होत्या? हे मला कळलं नाही. १७ कार त्यांनी ८ वर आणल्या याचा अर्थ स्थिती गंभीर आहे. त्याचा ते मंत्रीही गांभीर्याने विचार करत आहेत. अशी स्थिती देशात निर्माण झाली नव्हती असं नाही. पण एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी काळजी करावी लागेल अशी स्थिती येऊ नये म्हणून सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य करावं. मी हे सांगतो आहे त्यावेळी मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनीही आपली भाषा ही लोकांनी यात सहभागी व्हावं यासाठी पोषक असली पाहिजे. राहुल गांधींच्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी जे शब्द वापरले ते मला अयोग्य वाटले. राहुल गांधी हे संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे आणि लोकसभेचं पद आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

निवडणूक निकालानंतर बचतीचं आवाहन का केलं?

रुपयाचं अवमूल्यन होतं आहे, ते होतं आहे याचा विचार केला पाहिजे. इराणचा जो संघर्ष आहे त्याचा परिणाम होतो आहे. पण तेवढाच परिणाम आहे का? जर इराणमुळे हे घडलं असेल तर निवडणुकीच्या निकालानंतर हे सगळं जाहीर का केलं? निवडणूक काळात सरकारला हे गांभीर्य का आलं नाही? निवडणुकीच्या काळात जनतेत ही स्थिती का सांगितली नाही? तो विचारही आला नाही. काल की परवा मी पाहिलं की सोमनाथाच्या मंदिर जीर्णोद्धाराला ८५ वर्षे झाली त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले होते. अनेक लोक त्या कार्यक्रमात सहभागी होते. सहा विमानं त्या ठिकाणी होती. जर तुम्ही देशाला आवाहन करत आहात तर मग त्याच्या आदल्या दिवशी सहा विमानं घेऊन त्या कार्यक्रमाला का गेला होतात? तुम्हाला काय दाखवायचं होतं? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.

What Shard Pawar Said?
देशाला बचतीचं आवाहन करण्यापूर्वी पंतप्रधान हे सहा विमानं घेऊन सोमनाथला का गेले होते? शरद पवार यांचा सवाल. (फोटो-FE)

सोनं खरेदी करु नका असं पंतप्रधान म्हणालेत त्याचं कारण आहे-पवार

सोनं खरेदी करु नका वगैरे सांगणं याचा अर्थ एकच आहे की आपल्या करन्सीची किंमत कमी होऊ द्यायची नाही. एका बाजूने हे सांगितलं जातं आहे पण खर्च कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. प्रशासनात खर्च कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. काही परस्पर विरोधी गोष्टी सध्या पाहायला मिळत आहेत. मला स्वतःला असं वाटतं आहे की देशाच्या नागरिकांनी गांभीर्य ओळखलं आहे. लोकांचं सहकार्य ज्यात राहिल त्याच्याशी सुसंगत भूमिका आणि त्यात सातत्य हे राजकारण्यांनी केलं पाहिजे. कदाचित खूप टोकाला गोष्टी जातील असं वाटत नाही. पण काळजी घेतली पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज मोटरसायकलवर आले ते पाहिलं-शरद पवार

आज मी पाहिलं की देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयात मोटरसायकलवर आले. उद्यापासून ते रोज मोटरसायकलवर आले तर लोक त्यांना अधिक गांभीर्याने घेतील. ताफा ज्या मंत्र्यांनी कमी केला आहे त्यांनी त्याचा देखावा करु नये त्यात सातत्य ठेवावं. माझ्या ताफ्यामध्ये तीन कार होत्या. मी गेली तीन ते चार वर्षे अशाच पद्धतीने प्रवास करतो आहे. आता ज्या कार आहेत, त्यातही काही कमतरता करु शकतो का? याचा विचार आम्ही करतो आहो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.