Ajit Pawar NCP Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील राजकारणासह विविध विषयांवर भाष्य करत कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय कधी व का घेतला? याबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केलं. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे काही विभागाचे पैसे वळवल्याच्या आरोपावरही अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“मला आजही १० जून १९९९ हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळालं नाही. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावं लागलं. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण केंद्रात देखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे. पण सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. आता काही जण मला विचारतात की तुम्ही भाजपाबरोबर का गेला आहात? मी तुम्हाला सांगतो की, २०१९ साली आपल्या पक्षाने शिवसेना पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा देखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या. कारण शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्यामधून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“तिकडे सेक्युलर विचारांचे चंद्रबाबू नायडू देखील भाजपाबरोबर आलेले आहेत. एकेकाळी ममता बॅनर्जी या देखील एनडीए बरोबर होत्या. तसेच लालू प्रसाद यादव हे देखील एकेकाळी एनडीए बरोबर होते. शेवटी काय असतं की राज्याचा विकास झाला पाहिजे. आता जातनिहाय जनगनणा करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. याचं कारण सर्वांना समजलं पाहिजे की या देशात आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त समाज कोणता आहे, कोणत्या समाजाची किती संख्या आहे? कारण आपल्याला जर एखाद्या समाजाला निधी द्यायचा असेल तर किती निधी द्यायचा हा प्रश्न येतो. आता काही जण मुद्दामहून आपलं सरकार आल्यापासून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“काही जणांनी विधानं केले की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. आता या ठिकाणी नरहळी झिरवाळ आहेत. तसेच सर्वांना माहिती आहे की या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना आदिवाशी विभागाला आपण निधी वाढवून ४१ टक्के दिलेला आहे. पण ही माहिती सर्वांसमोर येत नाही. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत आपला ७५ टक्के पराभव झाला. आपली फक्त एक जागा निवडून आली. त्यानंतर आपण विचार केला की आपली काय चूक झाली. त्यानंतर लाडकी बहीण योजना पुढे आली”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी राज्यात फिरत असताना सर्वांना सांगत असतो की सर्व सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही. राज्याच्या उत्पन्नात देखील वाढ झाली पाहिजे. त्यासाठी काही निर्णय आम्ही घ्यावे लागतात. पण कधीकधी बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाही. मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का?”, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.