Raj Thackeray And Gautam Adani Photo : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात झोकून घेतलं आहे. त्यांच्या प्रचारसभाही प्रचंड गाजत असून त्यांनी प्रचारसभेत मांडलेल्या मुद्द्यांवर मोठ्याप्रमाणात चर्चाही घडत आहेत. दरम्यान, रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी गौतम अदाणी प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी २०१४ पासून म्हणजेच केंद्रात अन् राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर देशभर कसे त्यांचं जाळं विकसित केलं याचा नकाशाच जनतेसमोर जाहीर केला.
राज ठाकरेंनी आकडेवारीसहित गौतम अदाणींच्या उद्योगांवर आणि त्यांनी देशभर पसरलेल्या नेटवर्कवर भाष्य केल्याने राज ठाकरे आणि गौतम अदाणी यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. गौतम अदाणी यांनी दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. हेच भेटीचे फोटो व्हायरल करून राज ठाकरेंवर टीका होऊ लागली. या टीकेला आता राज ठाकरेंनी त्यांच्या ठाण्यातील भाषणात चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या घरी अनेकजण येऊन गेले
राज ठाकरे म्हणाले, “काल मी गौतम अदाणीचं प्रकरण काढलं. सर्वांना मिरच्या झोंबल्या. माझा आणि गौतम अदाणीचा फोटो सोशल मीडियावर टाकला. बरं मग पुढे? माझ्याकडे गौतम अदाणी येऊन गेले, रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, अनेक उद्योगपती, अनेक चित्रपट कलाकार येऊन गेले.”
“घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकायची का? मी काल जे दाखवलं ते इतकं भयानक आणि भीषण आहे. ते जे फोटो दाखवत आहेत ते दोन तीन वर्षांपूर्वीचा फोटो दाखवत आहेत. ते घरी आले तर त्यांना घरातून हाकलून देऊ? अदाणींशी मैत्री करण्याचा विचारच नाही माझा. मी इतका अडाणी नाहीय”, असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंनी भर सभेत ऐकवला ‘तो’ व्हिडीओ
“देवेंद्र फडणवीस मला बरा माणूस वाटायचा, आत्ता आत्तापर्यंत बरे वाटायचे. पण कितीही खोटं बोलत आहेत. ते अण्णामलाई आले होते आणि मुंबई महाराष्ट्राचं शहरच नाही बोलले. तरीही देवेंद्र फडणवीस म्हणतात की अण्णामलाई असं काही बोललेच नाही. किती हवं तेवढं देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत. अण्णामलाई सांगत आहे की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही. तरी फडणवीस म्हणतात त्यांच्या वक्तव्याचा तो अर्थच होत नाही. मला वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी समजतं. पण खोटं बोलत राहायचं”, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका करत देवेंद्र फडणवीस आणि अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ऐकवला.
