श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताब पूनावालाला अजून फाशीची शिक्षा का झाली नाही? असा सवाल श्रद्धाच्या आत्याने आता विचारला आहे. तसंच त्यांना पाकिस्तानातून फोन येत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर आफताबला सरकारी पैशांवर का पोसलं जातंय? असाही प्रश्न श्रद्धाच्या आत्याने विचारला आहे.
श्रद्धा वालकरच्या आत्याने काय सांगितलं?
श्रद्धाची हत्या होऊन चार वर्षे झाली आणि पाचवं वर्षे सुरु झालं आहे. आम्हाला आफताबविषयी हेच सांगितलं जातं की त्याच्या डेंटिस्टची अपॉईंटमेंट आहे. त्याला खूप त्रास होतो आहे. कधी सांगतात मेडिकल प्रॉब्लेम आहे. मी त्यांना विचारलं की तो वेडा आहे का? कारण ज्याने एवढा खून केला, जंगलात तुकडे फेकले तो वेडा नसतो तो शहाणाच असतो. त्याला शिक्षणासाठी मुभा देत आहेत. इतर मुलींसाठी तो धोका ठरु शकतो असं पोलिसांना वाटत नाही का? आत्ताच त्याचं डोकं इतकं शार्प आहे की त्याने श्रद्धा वालकरची हत्या केली आणि पूर्ण कट रचून तिच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकले. मे महिन्यात हत्या केली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात येऊन सांगतो की श्रद्धा कुठे गेली माहीत नाही. तिचा मोबाइलही हाच वापरत होता. श्रद्धा जिवंत आहे असं दाखवण्याचाही प्रयत्न केला एवढं त्या आफताबचं डोकं शार्प आहे. त्याला शिक्षण देऊन त्याचं डोकं आणखी सुपीक करायचं आहे का? किती मुलींचे मर्डर करायचे याचा अभ्यास तो करतोय का? जर आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा द्यायची आहे तर शिक्षणाची त्याला गरज काय? असा संतप्त सवाल श्रद्धाच्या आत्याने विचारला आहे. एबीपी माझा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे प्रश्न विचारले आहेत.
श्रद्धाच्या आत्याला पाकिस्तानातून फोन
महाराष्ट्रात जर लवकर निकाल लागत असतील तर केंद्र सरकारकडून आफताबच्या फाशीच्या शिक्षेसाठी का उशीर केला जातो आहे. या प्रकरणातले न्यायाधीश मॅनेज झाले आहेत का? असाही सवाल श्रद्धाच्या आत्याने केला आहे. मला पाकिस्तानातून फोन येत आहेत. हे व्हॉट्स अॅप कॉल आहेत. मी ते उचललेले नाहीत, त्यामुळे धमकीसाठी फोन येत आहेत का ते मी सांगू शकत नाही. मला या प्रकरणात पोलीस तक्रार करायची आहे. मला फोन येतात त्याची थोडी भीती आहे, पण मी फोन उचललेला नाही. असंही श्रद्धा वालकरच्या आत्याने सांगितलं.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण काय?
२७ वर्षीय कॉल सेंटर कर्मचारी श्रद्धा वालकर हिची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने मे २०२२ मध्ये दिल्लीतील मेहरौली येथील फ्लॅटमध्ये गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि दिल्लीच्या विविध भागांतील जंगलात विल्हेवाट लावली. या धक्कादायक गुन्ह्यानंतर १२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला यानं कोर्टासमोर हत्येची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टासमोर सांगितलं.
