scorecardresearch

“गांधींचे पुतळे उखडून नथुरामचे उभारा म्हणणाऱ्या भुजबळांना राष्ट्रवादीत घेणाऱ्या पवारांचं सत्तेत रहाणं हे एकमेव धोरण”

“त्यांचं जे महात्मा गांधींसंदर्भातील प्रेम आहे ते केवळ ढोंगीपणा आहे. त्याच्यापलीकडे त्याला काहीही अर्थ नाहीय.”

sharad pawar bhujbal
शरद पवार आणि राष्ट्रवादीवर भाजपा आमदाराची टीका (फोटो प्रातिनिधिक, सोशल मीडियावरुन साभार)

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचं कुठलंही निश्चित धोरण नसून त्यांचं महात्मा गांधींबद्दलचं प्रेम म्हणजे ढोंगीपणा असल्याची टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या वादासंदर्भात बोलताना भातखळकरांनी ही भूमिका मांडलीय.

छगन भुजबळांचा उल्लेख करत केली टीका…
“राष्ट्रवादी असा पक्ष आहे की ज्याला कुठला विचार नाही, धोरण नाही. शरद पवारांच्या आयुष्याचं ध्येय केवळ सत्तेत राहणं एवढंच आहे. ज्या छगन भुजबळांनी एकेकाळी महात्मा गांधींचे पुतळे उखडून टाका आणि त्या ठिकाणी नथुरामाचे उभे करा असं वक्तव्य केलं होतं, त्या छगन भुजबळांना पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समावून घेतलं,” असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

केवळ सत्तेत आलो पाहिजे
“राष्ट्रवादी किंवा शरद पवारांच्या धोरणांशी हे (प्रकरण) सुसंगत नाही. कोणी काहीही करो आपण केवळ सत्तेत आलो पाहिजे हे त्यांचं एकमेव धोरण असून त्याचाच हा परिपाक आहे,” असंही भातखळकर म्हणालेत. तसेच पुढे बोलताना भातखळकर यांनी, “एकीकडे महात्मा गांधीच्या विचारांबद्दल कौतुकाने बोलायचं आणि इथे स्वत:च्या पक्षाचा खासदार अनावश्यक पद्धतीने नथुरामची भूमिका साकारतोय त्यालाही पाठिंबा द्यायचा. त्यांचा वैचारिक ढोंगीपणा या निमित्ताने उघडा पडलेलाय,” असंही म्हटलंय.

नक्की वाचा >> अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, शरद पवारांनी…; काँग्रेसची आक्रामक भूमिका

गांधींवरील प्रेम ढोंगीपणा…
“राष्ट्रवादी आणि पवारांचं कुठलंही धोरण नाहीय, विचारसरणी नाहीय. त्यामुळे त्यांचं जे महात्मा गांधींसंदर्भातील प्रेम आहे ते केवळ ढोंगीपणा आहे. त्याच्यापलीकडे त्याला काहीही अर्थ नाहीय,” अशा शब्दांमध्ये भातखळकरांनी टीका केलीय.

राष्ट्रवादी नेत्यांची टीका पण पवार म्हणतात…
अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यासंदर्भात विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतलाय. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, अमोल कोल्हेंनी ती भूमिका पक्षामध्ये प्रवेश करण्याआधी साकारली असून एक कलाकार म्हणून माझा अमोल कोल्हेंना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?
अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why i killed gandhi movie issue bjp mla atul bhatkhalkar slams sharad pawar and ncp scsg

ताज्या बातम्या