समीर जावळे
Samay Raina : समय रैनाने १४ महिन्यांनी कमबॅक केलं आहे. युट्यूबवर त्याने Still Alive Samay Raina नावाने एक शो पब्लिश केला आहे. दरम्यान समय रैना इंडियाज गॉट लेंटेंटमुळे वादात सापडला होता. त्याला सगळे व्हिडीओ हटवावे लागले होते. आता नव्या व्हिडीओत त्याने पुन्हा एकदा काही वादग्रस्त विधानं, अमिताभ बच्चन, मुकेश खन्ना, सुनील पाल यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान ज्या शोमुळे तो वादात सापडला होता तो वाद काय होता हे आपण जाणून घेऊ. या
रणवीर अलाहबादियाचं वादग्रस्त वक्तव्य आणि वादाची ठिणगी पडली
मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या. शिवाय यामुळे समय रैनाला YouTube वर उपलब्ध असलेला सगळा कंटेट डिलिट करावा लागला. या प्रकरणात रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्या विरोधात तीन तीन FIR दाखल झाले.
“रणवीरने जो जोक केला तो अगदी सहज होता. पण तो त्याच्या इमेजला साजेसा नव्हता. कदाचित मी असं काही बोललो असतो तर लोकांना त्याचं फार काही वाटलं नसतं. शिवाय मी शो एडिट केला होता. रणवीरने त्या स्पर्धकाला आठ ते दहा वेळा हेच विचारलं होतं. मी एडिटमध्ये फक्त एकदा ठेवलं. त्यावरुन इतका वाद होईल याची पुसटशीही कल्पना नव्हती.”
समय रैना (१४ महिन्यांनी आलेल्या नव्या शोमध्ये स्पष्टीकरण)
अपूर्वा मुखीजाच्या विधानाने घातली वादात भर
अपूर्वा मुखीजादेखील या शोमध्ये उपस्थित होती. या शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाने अपूर्वाबाबत अश्लाघ्य शब्दांत एक वक्तव्य केलं. त्यावर अपूर्वाने जे उत्तर दिलं ते त्यापेक्षाही अश्लील होतं. ज्यामुळे रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादात तेल ओतण्याचं काम केलं. आशिष राय आणि पंकज मिश्रा या दोन वकिलांनी तिच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

अश्लीलतेची व्याख्याही सांगितली गेली होती
महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणात समय रैना, रणवीर अलाहबादिया, अपूर्वा मखिजा, आशिश चंचलानी आणि जसप्रीत सिंग यांची चौकशी केली होती. यशस्वी यादव यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये उल्लेख केलेल्या अश्लीलतेच्या व्याख्येचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, “लोकांच्या वासना व कामुकतेला आकर्षित करणाऱ्या गोष्टी अश्लील ठरतात, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. या व्याख्येनुसार, इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लीलतेचा वापर हा अधिक व्यूज, लाईक्स आणि पर्यायाने अधिक नफा कमावण्यासाठी केला जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे.” यानंतर पुढील काही दिवसांमध्ये समय रैना, रणवीर अलाहबादियासह इतरांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
रणवीर अलाहबादिया बीयरबाइसेप्स नावानेही ओळखला जातो
रणवीर अलाहबादिया हा प्रसिद्ध युट्यूबर असून तो ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखला जातो.
रणवीरचा पॉडकास्ट शो सर्वाधिक चर्चेत होता. अनेक मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे.
रणवीरने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर रणवीरने त्याचं उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ येथून पूर्ण केलं आहे.
‘बीयरबाइसेप्स’ हे त्याचं युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल १२ मिलियन फॉलोअर्स होते, या संपूर्ण प्रकरणानंतर त्याचे फॉलोअर्स कमी झाले होते.

वादावर १४ महिन्यांनी समय रैनाने काय स्पष्टीकरण दिलं?
समय रैना म्हणाला की बीयरबाइसेप्सने म्हणजेच रणवीरने जे विधान केलं आणि वाद निर्माण झाला ते वक्तव्य मी केलं असतं तर लोकांना काहीही वाटलं नसतं. पण मी त्या शोमध्ये जेव्हा गप्प बसलो होतो त्यावेळी रणवीर हे बोलून गेला. त्याची इमेज सभ्य, सुसंस्कृत अशी होती. त्यामुळे लोकांना तो असं काहीतरी बोलून जाईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र मला लोक सभ्य समजत नाहीत. शिवाय जे काही घडलं त्यावेळी शांत होतो तरीही माझ्या विरोधात तीन FIR आहेत. मी काश्मिरी आहे आणि काश्मिरी लोक कायम क्रॉस फायरमध्ये मारले जातात असं विधान समय रैनाने त्याच्या नव्या शोमध्ये केलंय. ज्यामुळे पुन्हा एकदा त्याला ट्रोल केलं जातंय.
समय रैनाने उडवली सुनील पाल, मुकेश खन्ना यांची खिल्ली
Samay Raina Still Alive या स्पेशल शोमध्ये त्याने हे विधान केलं आहे. आमच्यावर टीका करायला सगळेच आले होते. राजकारणी, पोलीस, सुनील पाल. सुनील पाल म्हणत होता कपिल शर्माकडून काहीतरी शिका. आम्ही कपिल शर्माकडून शिकायचं? आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये कपिल शर्मा येणार होता. कपिल शर्मा मला मेसेज करत होता की तू खूप चांगला शो करतोस. तुझं टायमिंग चांगलं आहे. लव्ह यूअर शो. आता अशात आम्हाला सुनील पालने आम्हाला सल्ले दिले. त्यावेळी अनेकांनी आमच्यावर टीका केली. शक्तिमानने (मुकेश खन्ना) आमच्यावर टीका केली. शक्तिमानसे कौन लडेगा, सॉरी शक्तिमान असं म्हणत समयने मुकेश खन्नाचीही खिल्ली उडवली. तो शक्तिमान म्हणत होता की यांच्या कंटेटचा मुलांवर काय परिणाम होईल. तुमच्यापैकी किती लोक शक्तिमान बघायचे मला माहीत नाही. त्या काळात दर महिना-पंधरा दिवसाला बातमी यायची एखादा मुलगा शक्तिमानची कॉपी करताना इमारतीवरुन खाली पडला. ज्या माणसाने मुलांना मारलंय तो आम्हाला काय सांगतोय? असं आता समय रैना म्हणाला. ज्यावर मुकेश खन्ना यांनी त्याला कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असं म्हणत उत्तरही दिलंय.

रोस्ट कॉमेडी आणि डार्क कॉमेडीमुळे ट्रोलिंग
स्टँड अप कॉमेडी हा प्रकार भारताला काय किंवा महाराष्ट्राला काही नवा नाही. यात मुख्यतः तीन प्रकार पडतात कॉमेडियनचे अनुभव, निरीक्षणं यातून त्याने निर्माण केलेला विनोद. दुसरा प्रकार आहे क्राऊड वर्क, लोकांशी संवाद साधायचा आणि त्यातून विनोद निर्मिती. तिसरा प्रकार आहे डार्क कॉमेडी किंवा रोस्टिंग. या प्रकारात वाट्टेल ते बोललं जातं. अगदी शिवराळ भाषा, सेक्स, अश्लील विषय हे सगळं आणून विनोद निर्मिती केली जाते. इंडियाज गॉट लेटेंटमध्ये नेमका हाच प्रकार घडला होता. त्याचा परिणाम खूप गहिरा झाला. अगदी लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे समय रैना आणि रणवीर अलाहबादिया यांना प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. पण मराठीत एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे किर्तनाने समाज सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत नाही. तसाच हा शिवराळ तमाशा पाहूनही लोक बिघडले नाहीत. पण त्यावेळी हा वाद गाजला. आता पुन्हा एकदा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ चा विषय समय रैनाच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.
