कुष्ठरोगातून बरे झालेले रूग्ण अनेकदा हात आणि पायाचे बोटं झडलेले असतात. त्यांचा कुष्ठरोग बरा झालेला असतो. मात्र त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ येते. त्यांच्यासाठी सरकारने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केली. तसंच त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं जावं त्यामुळे त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळू शकतं अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केली. अनेकदा कुष्ठरोगातून बरे झालेले रूग्ण हे भाजी विकतात किंवा छोटा-मोठा व्यवसाय करत असतात. मात्र लोक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करत नाहीत. हे सगळं टाळण्यासाठी आपण ठोस उपाय योजना केली पाहिजे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यासारखीच मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही केली आहे. आपण बरं झालेल्या कुष्ठ रोग्यांसाठी नोकऱ्यांची आणि उत्पन्नाची तरतूद आपण करणं आवश्यक आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत बहुतांश रूग्णांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रच मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे रोज कसं जगायचं हा प्रश्न आहे.
तानाजी सावंत यांनी काय दिलं उत्तर?
करोनाच्या काळात कुष्ठ रोगातून बरे झालेले रूग्ण, कुष्ठ रोग झालेले रूग्ण हे शोधण्याचं प्रमाण मंदावलं होतं. आता ते वाढवलं आहे. त्यासाठी आम्ही व्यवस्थित काम करतो आहे. त्या रूग्णांची शोध मोहीम तीव्र आणि प्रभावी करण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसानाचा प्रयत्नही आम्ही करतो आहोत असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिलं उत्तर
कुष्ठ रोगातून बरे झालेले जे रूग्ण आहेत ते आपलेच समाज बांधव आहेत. या सगळ्या रूग्णांना उपेक्षित आयुष्य जगावं लागतं. मात्र कुष्ठ रोग्यांसाठी त्यातून बरं झालेल्या रूग्णांसाठी प्रकाश आमटे आणि विकास आमटे यांच्यासारखे लोक काम करत आहेत. या रूग्णांच्या पुनर्वसानासाठी आपल्याला एक धोरण ठरवावं लागेल त्यासाठी एक समिती नेमून आम्ही त्या समितीत प्रकाश आमटेंना आणि विकास आमटेंना घेणार आहोत. कुष्ठरोगातून बरं झालेल्या रूग्णांसाठी आपण समिती गठीत केली जाईल. त्यांच्या रोजगाराचा, व्यवसायाचा विषय आहे त्यासाठी ही समिती काम करेल. अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा जो विषय आहे त्याची आपण चर्चा करू. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे त्या योजनेतूनही त्यांना मदत होईल का हे पाहू. सरकार या सगळ्या बाबत पूर्ण सकारात्मक आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.