नगर : शहराच्या सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे या रस्त्यावरील सुमारे १०० हून अधिक जुन्या व मोठय़ा वृक्षांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे वृक्ष कसे वाचवता येतील यासाठी आता वृक्ष प्राधिकरण समिती या रस्त्याची फेरपाहणी करणार आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीची सभा आज, गुरुवारी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी नगरसेवक महेंद्र गंधे, नगरसेविका पल्लवी जाधव, उपायुक्त यशवंत वांगे, समितीचे सदस्य प्रा. बी. एन. शिंदे, सुरेश खामकर, तुळशीदास पालीवाल, सामाजिक वनीकरणच्या श्रीमती पठाण तसेच समितीचे सचिव तथा उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान आदी उपस्थित होते.
समितीच्या बैठकीत गुलमोहर रस्त्याचा रुंदीकरणामुळे मोठय़ा वृक्षांना बाधा होत असल्याचा विषय उपस्थित करण्यात आला. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम यापूर्वीच सुरू झालेले आहे. यापूर्वीच्या सभेतही या विषयावर चर्चा झाली होती. या रस्त्यावर तीनशेहून अधिक झाडे आहेत, त्यातील काही रस्त्याला बाधा न आणणारी आहेत. मात्र या झाडांची गणना करताना चुकीच्या पद्धतीने झाल्याचे आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे समिती या रस्त्यावरील झाडांच्या ठिकाणांची फेरपाहणी करणार आहे. या रस्त्यावरील जुनी व मोठी झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मनपा आयुक्त गोरे यांनी समितीच्या सदस्यांना दिले.
महाराष्ट्र नागरी क्षेत्रातील झाडांचे जतन व संरक्षण अधिनियम १९७५ मध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर बेकायदा वृक्षतोड झाल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारणीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दंडाच्या रकमेची आकारणी किती असावी, यासाठी समितीच्या सभेत रक्कम निश्चित करण्याची आवश्यकता आहे. मात्र आज झालेल्या सभेच्या विषयपत्रिकेत त्याचा समावेश न झाल्याने याबाबत पुढील सभेत निर्णय घेतला जाणार असल्याचे खामकर यांनी सांगितले.