scorecardresearch

पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी, प्रियकर दोषी;  सोमवारी शिक्षेवर शिक्कामोर्तब

गडहिंग्लज येथे विजयकुमार यांची हत्या करून त्यांचा मृतदेह आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी कावळेसाद दरीत टाकला होता.

पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी, प्रियकर दोषी;  सोमवारी शिक्षेवर शिक्कामोर्तब
प्रतिनिधिक छायाचित्र

सावंतवाडी : प्रियकराबरोबरच्या अनैतिक संबंधात येत असलेला अडथळा कायमचा दूर करण्याच्या हेतूने  प्रियकराला सोबत घेत पती विजयकुमार गुरव यांची निर्घृण हत्या घडवून आणणाऱ्या पत्नी श्रीमती जयलक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र  न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी दोषी ठरवले आहे. आता सोमवारी निर्णय दिला जाणार आहे.   गडहिंग्लज येथे विजयकुमार यांची हत्या करून त्यांचा मृतदेह आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी कावळेसाद दरीत टाकला होता. या वर पोलिसांनी चौकशी करून न्यायालयात खटला दाखल केला होता. आरोपी सुरेश चोथे व जयलक्ष्मी गुरव यांनी संगनमत करत खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी  ठरविले. शुक्रवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाला.आरोपींच्या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब होईल.

पेशाने शिक्षक असलेले विजयकुमार गुरव हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगावचे सुपुत्र ते आर्थिक दृष्टय़ा खूप सदन होते. त्यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव हिचे त्याच गावात राहणाऱ्या सुरेश चोथे या पोल्ट्री व्यावसायिकाशी प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध नवरा विजयकुमार यांना समजतात त्यांनी त्याला विरोध केला. या विरोधामुळे संतप्त झालेल्या जयलक्ष्मीने आपल्या नवऱ्याचा कायमचा काटा काढण्यासाठी प्रयत्न सुरेश चोथे याच्या मदतीने कट रचला आणि ६ नोव्हेंबर २०१७ च्या मध्यरात्री राहत्या घरातील बेडरूममध्ये सुरेश चोथेच्या मदतीने डोक्यावर खलबत्त्यातील लोखंडी प्रहार करून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह वाहनात घालून तो घटनास्थळावरून सुमारे ४० किलोमीटर दूर असलेल्या आंबोलीतील कावळेसाद दरीत नेऊन टाकला. कावळेसाद दरीवरील कठडय़ावर पडलेल्या रक्ताच्या डागामुळे  या खुनाचे धागेदोरे मिळाले. सिंधुदुर्ग पोलिसांनी वेगाने या प्रकरणी तपास करून सुरेश चोथे व जयलक्ष्मी गुरव यांना मुंबईत परळ रेल्वे स्टेशनवर नाटय़मयरीत्या ताब्यात घेतले .या दोन्ही आरोपीवर निर्घृण खुनाचा गुन्हा दाखल करत सखोल तपास करून १४ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी माजी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी तपास करून या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले होते. विशेष सरकारी वकील अजित भणगे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या