scorecardresearch

मुलीकडे वाईट नजरेने पाहतो म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, धुळ्यातली धक्कादायक घटना

मृतदेहावर जो शर्ट होता त्या शर्टच्या खिशात एक बस तिकिट होतं ज्यावरून या हत्येची उकल झाली

Wife Killed Husband in Dhule
जाणून घ्या नेमकी काय घडली घटना? (प्रातिनिधिक छायाचित्र)

पोटच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या झाल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे घडला होता. कुठेही सबळ पुरावे नसताना पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या खुनात मयत तरुणाच्या पत्नीसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी काय घडली घटना?

विशेषतः कोणताही पुरावा नसताना मयताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मृत पतीच्या पत्नीसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साहाय्याने बांधण्यात आल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली.

घटनास्थळावर नव्हता एकही पुरावा पण बसचं तिकिट सापडलं आणि…

घटनास्थळावर मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. मात्र मयत तरुणाच्या खिशामध्ये असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका तिकिटाच्या मदतीने पोलीस तपास थेट मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील पोरबंदर गावापर्यंत जाऊन पोहोचला.

मृतदेह सापडल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला

मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या पथकाने सुरू केला. मयत तरुणाच्या अंगठ्याजवळ मुकेश नाव असल्याचे दिसून आले. मात्र त्या पुढील अक्षरे मृतदेह खराब झाल्यामुळे वाचणे अवघड होते. त्यातच मृतदेहाच्या खिशात असलेल्या तिकिटावरून तो चोपडा येथून शिरपूरपर्यंत आल्याचे निदर्शनास आले. तिकिटावर असलेली तारीख पाहता सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले. या फुटेजमध्ये तरुणाबरोबर एक महिला देखील बसमध्ये बसल्याचे निदर्शनास आले यावरूनच या गुन्ह्याची उकल झाली.

मयत तरुण मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील चाचऱ्या येथे राहणारा मुकेश राजाराम बारेला असल्याचे समोर आले. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी मयत असलेल्या मुकेश बारेला याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा, दिनेश उर्फ गोल्या वसुदेव कोळी आणि जितू उर्फ तुंगऱ्या लकडे पावरा या तिघांचा खून प्रकरणात संबंध असल्याची बाब निदर्शनास आली. संबंधित आरोपींना गुजरात राज्यातील पोरबंदर येथून पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

मयत मुकेश बारेला हा गेल्या दोन वर्षापासून त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता. त्यामुळे संबंधित महिला ही सुशील पावरा याच्या समवेत राहत होती. मुकेश बारेला याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. हे दोन्ही मुले मयत मुकेश बारेला याच्याकडेच राहत होती. मात्र मुकेश बारेला हा या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून त्याच्या पत्नीने त्याचा काटा काढण्याच्या मानसिकतेतून हा खून केल्याची कबुली मुकेश बारेला याच्या पतीने दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 21:39 IST