​सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील बांदा पंचक्रोशीत भटकंती करणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या वन्य हत्तीच्या अंगावर धगधगती मशाल फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्राणिप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेत हत्तीच्या डोक्याला दुखापत झाल्याचे दिसून येत असून, हा हल्ला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ​गेल्या सात दिवसांपासून ओंकार हत्तीच्या डोक्यावर जखम दिसत असल्याने ही दुखापत मशाल किंवा फटाक्यांमुळेच झाली असावी, असा दावा प्राणिप्रेमी करत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षादरम्यान हत्तीला शेतातून हुसकावून लावण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

व्हिडिओतील व्यक्तीचा गणवेश वन कर्मचाऱ्यासारखा दिसत असल्यामुळे वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
​’ओंकार फाउंडेशन’चे अध्यक्ष गुणेश गवस यांनी वनविभाग हत्तीला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हत्तीवर सुतळी बॉम्ब आणि मशाली फेकून त्याला जखमी केले जात असल्याचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. तर, प्राणिप्रेमी तुषार देसाई यांनी याआधीही सुतळी बॉम्ब फेकल्यानंतर वनविभागाने माफी मागितली होती, तरीही पुन्हा हा प्रकार घडल्याने दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी सांगितले की, हत्तीवर मशाल फेकण्याचे कोणतेही आदेश वनविभागाने दिलेले नाहीत.

व्हिडिओमधील व्यक्ती वन कर्मचारी आहे की खाजगी, हे स्पष्ट दिसत नाही. या घटनेचा शोध घेऊन दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच, हत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे सुरू असून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ​हत्तीच्या सुरक्षेसाठी वनविभागाच्या सहा टीम तैनात असतानाही हा प्रकार कसा घडला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.