रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मौजे लोवले येथे कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री उशिरा ही घटना घडली.
संतोष प्रदीप खेडेकर यांच्या मालकीच्या सुमारे १५ ते २० फूट खोल आणि १५ फूट व्यासाच्या कोरड्या विहिरीत पाच रानगवे पडल्याची माहिती कृषी सहाय्यक समीर दोरखडे यांनी रात्री ११.३० वाजता वनविभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वर-देवरुख परिमंडळाचे वन अधिकारी व त्यांच्या पथकाने आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली असता, विहिरीत दोन पूर्ण वाढ झालेले रानगवे आणि तीन पिल्ले अडकलेली असल्याचे दिसून आले. विहिरीची उंची अधिक असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य नव्हते. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत वनविभागाने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने विहिरीच्या एका बाजूने मातीचा रॅम्प तयार करण्याचा निर्णय घेतला.
सुमारे रात्री १.३० च्या सुमारास रॅम्प तयार झाल्यानंतर रानगव्यांच्या कुटुंबाने सुरक्षितपणे बाहेर पडत जंगलाच्या दिशेने कूच केली. या संपूर्ण कारवाईत कोणत्याही रानगव्याला इजा झाली नसल्याची माहिती वनविभागाने दिली.
हे बचावकार्य रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडुकर, सुरज तेली व सहयोग कराडे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पूर्ण केले.

