अकोले : कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन्यजीव विभागाने निर्बंध घातले आहेत. एका वेळेला ठरावीक संख्येनेच पर्यटकांना अभयारण्याच्या क्षेत्रात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच तपासणी नाके उभारली जाणार आहेत. नियमावली जारी केली आहे. मुसळधार पावसाळा सुरू असल्याने वन्यजीव विभागाने यापूर्वीच कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, सांदणदरी, घाटघरचा कोकणकडा, भंडारदरा या ठिकाणी वर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. आता अभयारण्यातही पर्यटकांच्या प्रवेशसंख्येवर मर्यादा आणली आहे. अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांत अनेक पर्यटनस्थळे आहेत. पावसामुळे लहान-मोठे धबधबे कोसळत आहेत. पावसात भिजण्यासाठी, निसर्ग पाहण्यासाठी दर वर्षी हजारो पर्यटक येतात.
पर्यटकांची वाढती संख्या, तसेच पावसाळ्यामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन बंधने लागू करण्यात आली आहेत. कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्र ३६१ चौरस किमी आहे. अकोले तालुक्यातील २५ गावांचा त्यात समावेश आहे.
तपासणी नाके
भंडारदरा वन्यजीव परिक्षेत्रात एका वेळेला ६०० पर्यटक संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या पर्यटकांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. राजूर क्षेत्रात रतनगड, सांदणदरी, भंडारदरा जलाशयाचा समावेश आहे. राजूर वन्यजीव परिक्षेत्रात एका वेळेला ५०० पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. अभयारण्य क्षेत्रात धूम्रपान, मद्यपान निषिद्ध करण्यात आले आहे. तसे आढळल्यास प्रवेश दिला जाणार नाही. धोकादायक ठिकाणी सेल्फी, रील बनवण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यटकांनी गाइड, सुरक्षा कर्मचारी, वन अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत घातल्यास, गैरवर्तन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अभयारण्य क्षेत्रात हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे येथे मुक्कामी राहणारे पर्यटकवगळता अन्य पर्यटकांना दुपारी ३ नंतर अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही. सायंकाळी पाचनंतर अभयारण्यात फिरण्यास मनाई आहे. भंडारदरा धरणालगत घाटघर रस्ता, रतनवाडी रस्ता येथे वन विभागाचे तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.