कराड : पाटण तालुक्यातील घोटील वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न उधळून लावत वनविभागाने सोमवारी रात्री धाडसी कारवाई करत या टोळीतील दोन जणांना रंगेहात पकडले. मात्र, अन्य दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. या फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील घोटील परिसरात सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास काही व्यक्ती शिकारीसाठी फिरत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार या वन अधिकाऱ्यांनी तात्काळ सापळा रचत परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, काही वेळातच संशयित हालचाली आढळून आल्याने वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने शिकारीच्या तयारीतील या टोळीवर झडप टाकली.

या कारवाईदरम्यान सुरेश विनायक मोरे (रा. आंबवडे- कोळे, ता. कराड) आणि सतीश विश्वासराव पाटील (रा. कुसूर, ता. कराड) यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. मात्र, कराड शहरातील दोघे तरुण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत कलम २६ (१)(अ), तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील कलम ९, ५० व ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कायद्यानुसार आरोपींना तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, तसेच वनपाल व वनरक्षकांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.