Ajit Pawar On Sharad Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांमागील कारण म्हणजे मागील काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार अनेकवेळा एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता खुद्द अजित पवार यांनीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांच्या संदर्भात अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर बोलताना अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘घरातील कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतोच.’
अजित पवार काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? भविष्यात काही वेगळं चित्र दिसेल का? असं अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सर्वजण (शरद पवार, सुप्रिया सुळे) आले होते. घरातील कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच, एकत्र येतोच. आमची विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून जिथे कुठे सुख आणि दु:खामध्ये आपण नेहमी एकमेकांच्या बरोबर असतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी दिली होती तीन शब्दांत प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी) काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत ३१ मे रोजी पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “मला माहिती नाही.”
शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे रविवारी पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी एका बैठकीत एकत्र आले होते. यावेळी दोघांमध्ये काही वेळ संवाद देखील झाल्याचं बोललं जातं. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दारांच्या आड चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अजित पवार किंवा शरद पवार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती.