पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या गाडीवर दगडफेक आणि हल्ला दुर्दैवी असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमानिमित्त नारायण राणे हे वाराणसी येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना पंजाबमधील घटनेसोबत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबतही भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदाचा दावेदार मी असणार असे कोणी सांगितले. मी तर असे कधी बोललो नाही. तुम्हाला काही भविष्य माहिती असेल तर माझा हात पाहा आणि सांगा. मी असा काही विचार केलेला नाही. मी एकदा मुख्यमंत्री झालो आहे आणि आता केंद्रात मंत्री आहे,” अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : “…याला अक्कल म्हणतात”, अजित पवारांना नारायण राणेंचा खोचक टोला!

महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेली करोना रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनबाबत तेथील सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचे नारायण राणे म्हणाले. यामुळेच लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. कारण महाराष्ट्र सरकार करोना विषाणूचा आणि राज्य दोघांनाही सांभाळू शकत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाणार होते, मात्र खराब वातावरणामुळे ते रस्त्याने गेले. त्यांना वाटेत अडवण्यात आले आणि समोरून दगडफेक आणि हल्ला झाला. मी त्या घटनेचा निषेध करतो,” असे नारायण राणे म्हणाले.

“एकमेकांची उणी दुणी काढण्यापेक्षा…”; नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा सल्ला

दरम्यान, तरुणांना रोजगाराशी जोडण्यासाठी वाराणसीमध्ये कॉयर बोर्ड (नारळ उद्योग) कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होईल. दक्षिण भारतामध्ये तरुणांना उद्योगाशी जोडण्यासाठी एक फायबर बँक उघडली जाईल, जिथे दक्षिण भारतातून कच्चा माल येईल. वाराणसीसह, प्रयागराज, लखनऊ आणि कानपूरमध्येही कॉयर बोर्ड शोरूम उघडतील, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

गुरुवारी, नारायण राणे यांनी काशीमध्ये कॉयर उद्योग  उभारण्याचे आश्वासन दिले. वाराणसीमध्ये आयोजित कॉयर फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या नारायण राणेंनी, काशीमध्ये कॉयर उद्योगाचे चार मोठे शोरूम उघडतील. यामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल, असे सांगितले.

“काशीमध्ये लघु उद्योगाला चालना देण्यासाठी आता लोकांना अनुदानावर मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच कच्चा मालही दिला जाईल, जेणेकरून लोक तागाचा माल बनवून स्वयंपूर्ण होतील. त्यामुळे लघु उद्योगाला चालना मिळेल,” असे नारायण राणे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will he be the cm of maharashtra again narayan rane reply abn
First published on: 07-01-2022 at 14:01 IST