कथावाचक धीरेंद्र शास्त्री यांचा मुंबईजवळच्या मीरा रोड येथे प्रवचनाचा कार्यक्रम सुरू (१८ आणि १९ मार्च) आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता. एकीकडे शास्त्रींच्या कार्यक्रमाला मुंबईतल्या उत्तर भारतीयांनी गर्दी केली आहे, तर दुसरीकडे पुरोगामी विचारवंतांचा या कार्यक्रमाला विरोध आहे. तरीदेखील हा कार्यक्रम मीरा रोड येथे सुरू आहे. या कार्यक्रमावेळी त्यांनी त्यांच्या विरोधकांवर तोंडसूख घेतलं.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “संपूर्ण भारताला रामाचा भारत बनवायचं आहे. मला माहिती आहे लोक मला सोडणार नाहीत, पण आम्हीदेखील त्यांना सोडणार नाही. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आई म्हणत होती तिकडे जाऊ नको. मी तिला विचारलं का जाऊ नको? तर त्यावर आई म्हणाली, तिकडे गेल्यावर पुन्हा एकदा रात्रभर जागरण करावं लागेल, मग उत्तरं देत बसशील.”
यावर शास्त्री म्हणाले की, “मीसुद्धा आईला म्हणालो, आई हे प्रश्न आणि उत्तरं सुरूच राहील. प्राण आहेत तोवर तू आशीर्वाद दे. आम्ही या धर्मविरोधी लोकांना सोडणार नाही.” संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अपमान केल्यामुळे वारकरी संप्रदाय शास्त्रींवर संतप्त आहे. तसेच त्यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शास्त्री यांच्या या कार्यक्रमाला पुरोगामी विचारवंत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला आहे.
हे ही वाचा >> “आम्ही १३० ते १४० जागा लढवणार, इतरांच्या शब्दाला काही अर्थ नाही” बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय गायकवाड आक्रमक
जितेंद्र आव्हाडांचा विरोध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पायाच्या नखाचीही सर ज्याला नाही अशा बागेश्वरला काही लोक महाराज म्हणतात. त्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय. तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वरचं किर्तन महाराष्ट्रात होणं हा दुर्दैवी प्रकार सुरू आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत.”