अलिबाग– गेल्या चार दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाने अलिबागच्या पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. पण गेल्या काही वर्षात पक्षाची झालेली वाताहत आणि घटलेला जनाधार यामुळे पंचायत समितीवरची सत्ता शेकाप कायम राखणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
१९८५ पासून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे अलिबाग हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या नऊ वर्षात पक्षाच्या वर्चस्वाला ओहोटी लागली असल्याचे दिसून येत आहे. सलग दुसऱ्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदारसंघातून पाडाव झाला आहे. अनेक जुने जाणते आणि जनाधार असलेले नेते पक्षाला सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्ष सध्या अतिशय खडतर परिस्थितीतून वाटचाल करत आहे.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच शेकापने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषदेचा सात तर पंचायत समितीच्या १४ जागा आहेत. जिल्हा परिषदेच्या सात पैकी पाच जागा शेकाप लढवत आहे. तर २ जागा शेकापने मित्र पक्षांना सोडल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १४ जागांपैकी १३ जागा शेकाप तर एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे. उमेदवारांची निवड करतांना शेकापला पहिल्यांदाच मोठा संघर्ष करावा लागला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने पहिल्यांदाच १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
त्यामुळे पहिल्यांदाच शेकाप नवख्या उमेदवारांसह निवडणुकीत उतरला आहे. आवास, किहीम, थळ, सावरोली, रामराज या मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत आहे. आक्षी मतदारसंघात पाच उमेदवार आहेत. आंबेपूर, शहापूर, वैजाळी या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत आहे. रूईशेत भोमोली, चेंढरे,रेवदंडा, चौल व कावीर पाच मतदारसंघांमध्ये तीरंगी लढत आहे. पक्षातून फुटून भाजप आणि शिवसेनेत गेलेले उमेदवार शेकाप विरोधात उभे ठाकले आहेत. पंचायत समितीवर सत्ता कायम राखण्यासाठी पक्षाच्या किमान आठ जागा निवडून आणणे आवश्यक आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढती ताकद लक्षात घेतली तर पंचायत समितीवर सत्ता कायम राखण्यासाठी शेकापला टोकाचा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

