शिवेसना – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि काँग्रेसमधील बड्या नेत्यांचे पक्षांतर पाहता आगामी निवडणुका महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही दिवसांत काँग्रेसमधील तीन बड्या नेत्यांनी विविध पक्षांत पक्षांतर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एक होण्याची चर्चा आहे. तसंच, शरद पवारांनी यासंदर्भात बैठक घेतली असल्याचंही बोललं जातंय. आज पुण्यातही शरद पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, रोहित पवार उपस्थित होते. या बैठकीत विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.

“आज पवारांच्या सुचनेनुसार मी तुमच्याशी संवाद साधत आहे. आमचे विद्यमान आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री यांची बैठक पवारांनी घेतली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाली. या प्रकरणाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत लावण्याकरता मागणी करण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं. शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली आम्हाला लढायचं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाव आणि चिन्ह दिलं तर आम्ही आमची स्वतंत्र भूमिका घेऊन विधानसभा आणि लोकसभेत जनतेसमोर जाणार आहोत”, असं प्रशांत जगताप म्हणाले.

“महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा पहिला मेळावा पुण्यात २४ तारखेला १२ ते ३ वाजता आयोजित केला आहे. काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, आम आदमी पार्टी, माकप, भाकप सर्व मंडळी या मेळाव्याला येणार आहेत. तसंच, २१ तारखेला मंचरच्या सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत”, असही प्रशांत जगताप म्हणाले.

पक्षाचं विलिनीकरण होणार नाही

आजच्या बैठकीत पक्षनाव आणि चिन्हाबाबत चर्चा झाली. दुसऱ्या पक्षात विलिन होण्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्णय करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या नावाने जनतेत जाईल आणि निवडणूक लढवेल, असं प्रशांत जगतापांनी स्पष्ट केलं.

“सोशल मीडिया, महाराष्ट्रातील जनता आणि तरुण पिढीवर माझा एवढा विश्वास आहे की कोणतंही नाव आणि चिन्ह मिळालं तरी ५९ मिनिटांच्या आत संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हे चिन्ह पोहोचेल. आमच्यादृष्टीने शरद पवार हेच नाव आणि चिन्ह, त्यामुळे कोणतंही नाव आणि चिन्ह मिळालं तरी चालेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शशिकांत शिंदे काय म्हणाले?

“विलिनीकरणासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत विलिनीकरणाचा विषय झालेला नाही. ही बातमी चुकीची आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी दिली.

मंगलदास बांदलाचा दावा काय?

पुण्यात आज शरद पवार गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीतून नेते मंगलदास बांदल बाहेर पडले. त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला, काँग्रेस आणि शरद पवार गट विलीन होणार? त्यावर बांदल म्हणाले, विलिनीकरणाचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. पण त्यावर चर्चा चालू आहे.

Story img Loader