शेतकऱ्यांच्या जिद्दीपुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी देशाला १८ मिनिटांच्या भाषणात ही मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा सरकारने चांगल्या हेतूने आणला होता, मात्र काही शेतकऱ्यांना पटवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते म्हणाले. याबाबत आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जो चांगला दर मिळण्याचा आनंद मिळणार होता ते कायदे पर्याय नसल्यामुळे मोदींना मागे घ्यावे लागत आहे. अनेक महिने आंदोलन चालू आहे. देशातील अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना हे कायदे मान्य आहेत. पण एक विशिष्ट गट हा विषय घेऊन देशभर अडथळे निर्माण करत होता. कायद्यावर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन का करत आहात अस सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा झाडले. इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करुन घेऊ शकत नाहीत असे सुप्रीम कोर्टाने म्हटल्यावरही ऐकले गेले नाही. त्यामुळे मोदींनी ही घोषणी केली,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी पहिल्यांदाच मन की बात…”; कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“मी स्वतः महाराष्ट्राचा कृषीमंत्री, पणनमंत्री होतो. यातल्या एक कायद्यामध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर विकायची परवानगी देण्यात येणार होती. यामध्ये चुकीचे काय होते? या देशामध्ये काही चांगले असले की मोदींना विरोध. त्यांच्या निर्णयांना विरोध मग ते सर्वसामान्यांच्या हिताचे असले तरी चालतील. त्यामुळे एका छोट्या गटाला पटवून देण्यामध्ये आम्हाला अपयश आल्याचे मोदींने म्हटले. देशामधील अशांतता संपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. मी मोदींना विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“या कायद्यावर महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी होते, त्यांना कायदे पटले होते. केवळ काही विशिष्ट वर्ग याला विरोध करतात, मोदींचं मन मोठं आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.