महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच त्यांच्या वक्तव्यांसाठी आणि त्यांच्या खास शैलीतल्या उत्तरांसाठी ओळखले जातात. सध्या देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होणार का? हा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर अत्यंत समर्पक असं उत्तर दिलं. एवढंच नाही तर २०२९ नंतर आपण कुठे असणार आहोत हेदेखील त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय?

काँग्रेसचे नेते, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते हे सगळेच देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, पंतप्रधान होतील अशी चर्चा करत असतात. याबाबत प्रश्न विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, या देशाचा इतिहास असा आहे की जे पीएम इन वेटिंग आहेत ते जन्मभर वेटिंगवरच राहिले आहेत. त्यांचं वेटिंग कधीच कन्फर्म झालेलं नाही. भारतात व्हेकन्सीही नाही. २०२९ ला मोदीजीच पंतप्रधान होतील. २०३४ ला देखील मोदीच पंतप्रधान होणार आहेत. काही लोक माझ्याबद्दल जी चर्चा करत आहेत ते मनातून शुभेच्छा देत आहेत. तर काही लोकांना वाटतं बला टळली तर बरं आहे. मी अगदी स्पष्ट सांगतो आहे की माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवू इच्छितात. २०२९ पर्यंत मी महाराष्ट्रात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढारी न्यूजच्या समिटमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं आहे.

२०२९ नंतर दिल्ली की महाराष्ट्र? यावरही दिलं उत्तर

२०२९ नंतर तुम्ही महाराष्ट्रात असणार की दिल्लीत जाणार? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्ष पाठवेल तिथे. पक्षाने दिल्ली सांगितलं तर दिल्ली, महाराष्ट्र सांगितलं तर महाराष्ट्र आणि पक्षाने सांगितलं की नागपूरला जा तर धरमपेठ असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

वाढवणची क्षमता आपण ओळखलेली नाही-देवेंद्र फडणवीस

आपुलकी वाटणारा प्रकल्प कुठला हे विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रत्येक प्रकल्पाशी माझं भावनिक नातं आहेच. पण आज विचाराल तर देशाला आणि महाराष्ट्राला बदलण्याची क्षमता ज्या प्रकल्पात आहे असा वाढवण बंदर प्रकल्प. वाढवण प्रोजेक्टची क्षमता कुणाच्या लक्षात येत नाही. आपली मॅरेटाइम पॉवर जेएनपीटी पोर्टमुळे आहे. पण वाढवणचं जे बंदर आहे जेएनपीटी पेक्षा तीन पट मोठं आहे. वाढवण हे जगातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये वाढवण येतं. व्यापारात ज्याच्याकडे मॅरिटाइम पॉवर आहे तोच व्यापारांचा राजा आहे. एकट्या पालघर जिल्ह्यात वाढवणमुळे १० लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आपल्याला जर चीनला सप्लाय चेन मध्ये रिप्लेस करायचं असेल तर लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल. ती वाढवणच्या बंदराच्या माध्यमातून आपण करु शकणार आहोत. मला २५ ते ३० वर्षांनी महाशक्ती म्हणून भारत पाहतील त्यात सर्वात मोठा वाटा वाढवण बंदराचा असेल. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.