उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा गारवा

गेल्या आठवडय़ापासून राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत खाली गेल्याने रात्री आणि पहाटे पुन्हा गारवा अवतरला आहे. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात चढ-उतार होणार आहेत. दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे २ मार्चला विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या आठवडय़ापासून राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली होती. बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला होता. कमाल तापमानातही वाढ झाल्याने हवेतील गारवा नाहीसा होऊन उकाडा जाणवू लागला होता. उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र असतानाच गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात घट होऊ लागल्याने संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवतो आहे. गुरुवारी विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी, तर मराठवाडय़ात ३ ते ४ अंशांनी घट झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १ ते ३ अंशांनी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी चांगलाच गारवा जाणवतो आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाचा पारा १ ते ३ अंशांनी खाली आल्याने दुपारी उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे.

उत्तरेकडील राज्यामध्ये सध्या किमान तापमानात घट होऊन थंडी अवतरली आहे. तेथून राज्याच्या दिशेने येणारे थंड वारे आणि राज्यातील कोरडय़ा हवामानामुळे गारव्यात वाढ होत आहे. गुरुवारी नगर येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २ मार्चला विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

किमान तापमान  : मुंबई (कुलाबा) २०.५, सांताक्रुझ १८.२, अलिबाग १८.२, रत्नागिरी १६.५, पुणे १०.६, जळगाव १५.०, कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर १०.४, मालेगाव १४.८, नाशिक १२.२, सांगली १३.६, सातारा ११.१, सोलापूर १६.६, औरंगाबाद १५.०, परभणी १५.४, नांदेड १५.५, बीड १५.०, अकोला १६.४, अमरावती १४.४, बुलडाणा १६.५, ब्रह्मपुरी १५.९,चंद्रपूर १९.०, गोंदिया १४.५, नागपूर १५.६, वाशिम १५.०, वर्धा १५.६ आणि यवतमाळ १५.४.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Winds from northern area bring maharashtra temperature down

ताज्या बातम्या