पसंतीची बियर उपलब्ध करून दिली नसल्याच्या कारणावरून वाईन शॉप व्यवस्थापकाचा खंजीरने भोसकून खून केल्याची संतापजनक घटना सिडको येथील ढवळे कॉर्नर येथे गुरूवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना रात्रीतून ताब्यात घेतले असून उर्वरित तीनही आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले.

अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या ढवळे कॉर्नर येथे माजी नगरसेवक संदीप चिखलीकर यांचे प्रदीप वाईन शॉप आहे. या वाईन शॉपमध्ये एकूण चौघेजण काम करतात. तेथे माधव वाकोरे हे व्यवस्थापक होते. गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान एक जणाने ट्युबर्ग नावाची बियर देण्याची मागणी तेथील नोकराकडे केली; परंतु त्याने अशी बियर उपलब्ध नसल्याचे त्याला सांगितले. परंतु ती बियर मला उपलब्ध करून दे अन्यथा येथे दुकान चालू देणार नाही, अशी धमकी त्याने दिली. तरीही यावेळी बियर उपलब्ध होणार नसल्याचे त्याला सांगितल्यानंतर त्याने काही वेळात पाच ते सहा मित्रांना सोबत घेऊन आला आणि त्यांना धमकी देण्यास सुरूवात केली. 

यावेळी या दोघांमध्ये वादावादी, बाचाबाची झाली. त्यातील दोघांनी दुकानातील दोन नोकरांना मारहाण करण्यास सुरूवात केली. प्रेमसिंग सपुरे याने क्रिकेटच्या बॅटने व्यवस्थापक माधव वाकोरे यास मारहाण केली. नंतर खंजीरने पाठीमागून त्यांच्या बरगडीत भोसकले. वाकोरे हे रक्तबंबाळ झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान सहाही आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि शोधकार्य करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. घटनेतील प्रमुख आरोपी त्रिकुट येथील प्रेमसिंग सपुरे याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गँगस्टर आशिष सपुरे याच्या भावकीतील आहे. इतर आरोपींविरुद्धही किरकोळ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, स्थागुशाचे पो.नि.चिखलीकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. शुक्रवारी मृत वाकोरे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी काटकळंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.