सिया गोयल या तरूणीने तिचा होणारा पती केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून देत हत्या केली असा आरोप तिच्यावर आहे. तसंच तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीने तिला या प्रकरणात मदत केली होती असाही आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. आता पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रत्यक्षदर्शीने सिया आणि चेतन यांनी केतनला धक्का दिला हे पाहिलं होतं अशी माहिती समोर आली आहे. साक्षीदाराचं नाव पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून जाहीर केलेलं नाही.
प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना काय सांगितलं आहे?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना जबाब दिला आहे. तो म्हणाला, त्याने केतन आणि सियाला एकत्र बघितलं. त्यांच्या मागून चेतन येत होता. कडक उन होतं तरीही चेतनने हुडी घातली होती. त्यामुळे इतक्या उन्हात हुडी का घातलीस असं मी चेतनला विचारलं होतं असं या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे. तसंच त्यामुळेच चेतनचा चेहरा मला लक्षात राहिला असंही या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे
प्रत्यक्षदर्शीने केतनच्या हत्येबाबत काय सांगितलं?
प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शी मित्रांपासून बाजूला गेला त्याचं लक्ष सियाकडे होतं. सियाने बोटाने चेतनला इशारा केला त्यानंतर सिया खाली बसली, खाली बसतना तिने केतन अग्रवालला लाथ मारली, त्याचवेळी चेतन चौधरी धावत आला त्याने केतनला दरीच्या दिशेने ढकललं असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. यानंतर आपण चेतनला याबाबत विचारणा केली, त्यावर चेतन प्रत्यक्षदर्शीला म्हणाला तू शांत बस नाहीतर तुलाही लोहगडावरून असाच ढकलून देईन ही धमकी त्याने दिली असा दावा या प्रत्यक्षदर्शीने केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर घाबरलेल्या या व्यक्तीने मित्रांनाही काही सांगितलं नव्हतं. पण घरी गेल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. तसंच माध्यमांमधून लोहगड केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाची माहिती समोर आली, ज्यानंतर या प्रत्यक्षदर्शीने पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला.
नेमकं प्रकरण काय आहे?
१८ जूनला केतन अग्रवाल या तरुणाला लोहगडावरुन धक्का देऊन सिया गोयलने ठार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सियाला तिचा प्रियकर चेतन चौधरीने साथ दिल्याचंही समोर आलं. या दोघांवर हत्येचा आरोप असल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. सिया आणि केतन यांचं लग्न डिसेंबर महिन्यात होणार होतं. पण सियाला केतन नाही तर चेतन आवडत होता. त्यामुळे तिने केतनची लोहगडावरुन धक्का देऊन हत्या केली आणि तो अपघात आहे असं भासवलं.
