जेजुरी वार्ताहर
सासवड -जेजुरी पालखी महामार्गावर बोरावके मळ्याजवळ असलेल्या रस्त्याकडील विहिरीत फूट खोल पाण्यात रिक्षा पडून झालेल्या अपघातात नवविवाहित दांपत्यास एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र दोघांना वाचवण्यात पोलीस यशस्वी झाले. अपघात रात्री आठच्या सुमारास झाला.रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून रिक्षा विहिरीत कोसळल्याचे समजते. या अपघातात रोहित विलास शेलार( वय-२३ ), वैष्णवी रोहित शेलार (वय-१८) श्रावणी संदीप शेलार, ( वय-१७) यांचा मृत्यू झाला तर शीतल संदीप शेलार (वय-३५) आदित्य मधुकर घोलप (वय-२२)हे जखमी झाले आहेत सर्वजण धायरी पुणे येथील राहणारे आहेत.




अपघातात रोहित शेलार व वैष्णवी या नवविवाहित जोडप्याचा अंत झाला. सोमवारी (दि.२५ सप्टेंबर) हे कुटुंबीय रिक्षाने जेजुरी येथे देवदर्शनासाठी आले होते, घरी परतताना रात्री आठचे सुमारास हा अपघात झाला.सुखी प्रपंचाची सुरुवात होण्याअगोदरच या नवविवाहित शेलार दांपत्यावर काळाने घाला घातला. सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. २६) सकाळी सात वाजण्याच्या सुमाराला पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली.
खळद येथील देवेंद्र कामथे व तेजस कामथे हे दोघे तरुण नेहमीप्रमाणे सकाळी रस्त्याने व्यायामासाठी जात असताना त्यांना विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज आला, त्यांनी विहिरीत पाहिले असता एक पुरुष व महिला दोरीला लटकून वाचवण्यासाठी आक्रोश करीत असल्याचे दिसले. त्यांनी सासवड पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन दोघां जखमींना बाहेर काढले. तीन जण पाण्यात असल्याचे यावेळी समजले. पोलिसांनी तातडीने सासवड व जेजुरी नगरपालिकेचे अग्निशमन दल,भोर येथील भोईराज जलआपत्ती संघ यांना बोलावले.तीन मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आले.