महिलेने नेमके काय म्हटले आहे?
२०१७ मध्ये माझ्या अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिला मादक पदार्थ खायला घालून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी फक्त एका नराधमाविरोधात तक्रार दाखल केली इतर सहा जणांना मोकाट सोडले. ज्यानंतर मी दाद मागण्यासाठी मी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना भेटले. मी त्यांच्या कार्यालयात गेले होते त्यावेळी ते माझ्या अंगावर खेकसले. तुमची लायकी काय आहे? जास्त बडबड करू नका असे म्हणत मला आणि माझ्या मुलीला हाकलून दिले असे या महिलेने म्हटले आहे.
मात्र हे सगळे आरोप दीपक केसरकर यांनी फेटाळून लावले आहेत. पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून मी माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न केले. जेव्हा ही महिला आणि तिची मुलगी मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात आले होते त्यावेळी माझ्या कार्यालयात २० ते २५ लोक होते. जे काही घडले ते सगळ्यांनी पाहिले ही महिला जो दावा करतेय त्यात तथ्य नाही. अल्पवयीन मुलीसोबत जे घडले ते क्लेशदायकच आहे. मी त्यांना माझ्या परिने दिलासा देण्याचा प्रयत्न केला खेकसलो नाही आणि अपमान तर मुळीच केला नाही असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.