अंबाजोगाई तालुक्यातील सनगावात वकील महिलेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी सरपंचासह दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप एकाही आरोपीला शुक्रवारी सायंकाळपर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. सरपंच अनंत अंजानसह दहा जणांवर गुन्हे दाखल असून, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, अशी माहिती युसूफ वडगाव (ता. केज) येथील पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सांगितले.
एके काळी आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या सनगावात १४ एप्रिल रोजी गावातील मंदिरावर लावलेल्या भोंग्याचा व पिठाच्या गिरणीच्या आवाजावरून पीडित वकील महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या रागातून तिला लोखंडी गजासह लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) यांनी केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनगवातील वकील महिलेला मारहाण झाल्याच्या प्रकरणावर एक संदेश प्रसारित केल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनीही चौकशीच्या संदर्भाने प्रतिक्रिया दिली. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली.
बीडमध्ये आणखी काम करावे लागेल
बीडमधील गुन्हेगारीच्या विरोधात गेल्या काही महिन्यांत सरकारने भरपूर काम केले आहे. पण या जिल्ह्यात घडणाऱ्या घटना लक्षात घेता या जिल्ह्यात आणखी काम करावे लागेल, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.