संगमनेर : किरकोळ वादातून कर्जुलेपठार येथे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृत महिलेची नणंदही गंभीर जखमी झाली. तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बुधवारी दिला.
रूपाली ज्ञानदेव वाघ असे हत्या झालेल्या तर, मोनिका वाघ असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जुलेपठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ (वय २५) यांनी संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या घराजवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांचे कुटुंब राहते. मंगळवारी वाघ यांच्या कुटुंबातील दोघी पडवळ यांच्या शेतातून जात असताना विक्रम पडवळ याच्यासोबत त्यांचा वाद झाला.
या घटनेनंतर अजित वाघ, त्यांचे भाऊ ज्ञानदेव वाघ हे पडवळ यांच्या घरी गेले. त्यावेळी विक्रम पडवळ, मुरलीधर पडवळ आणि अलका पडवळ यांनी त्यांना शिवीगाळ केली. वाघ कुटुंबीयांनी आपण माफी मागितल्यावरही पडवळ याने रुपाली वाघवर चाकूने हल्ला चढवला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी मधे आलेल्या मोनिका यांच्यावरही पडवळने चाकूने वार केले. वाघ यांनी लगेच रुपाली आणि मोनिका यांना दुचाकीवरून खासगी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात पाठवले. प्रवरा रुग्णालयात आज मध्यरात्री १३.३० च्या सुमारास रुपाली वाघ यांचा मृत्यू झाला. मोनिका वाघ यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ, आणि अलका विक्रम पडवळ (सर्व रा. कर्जुलेपठार) यांच्याविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. घारगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.